Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Pune › अपघातात डॉक्टरसह कुटुंबातील चौघे ठार

अपघातात डॉक्टरसह कुटुंबातील चौघे ठार

Published On: Dec 12 2017 2:42AM | Last Updated: Dec 12 2017 2:41AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे-बंगळुरू महामार्गावरील जांभूळवाडी नवीन बोगद्याजवळ ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात डॉक्टरसह कुटुंंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या मुलीला महाविद्यालयात सोडण्यास आलेल्या कु टुंबावर रविवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. नियंत्रण सुटल्याने कार ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. यशवंत पांडुरंग माने (56, रा. सध्या मुंबई, मूळ काळचौंडी, ता. माण. जि. सातारा), पत्नी शारदा यशवंत माने (47), मुलगा ऋषीकेश यशवंत माने (19) आणि रामचंद्र कृष्णा सुर्वे (70) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पोलिस शिपाई कांचागळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषीकेश माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने कुटुंबीय मूळचे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील काळचौंडी या गावचे आहे. यशवंत माने हे डॉक्टर असून, ते कुटुंबीयासह मुंबई येथे असतात. त्यांची मुलगी शुभांगी सातार्‍यात वैद्यकीय शिक्षण घेते. ती शेवटच्या वर्षाला आहे. तर, मुलगा ऋषीकेश हा मुंबईत बारावीमध्ये शिक्षण घेतो. 

रविवारी कामानिमित्त ते मूळ गावी आणि मुलीला महाविद्यालयात सोडण्यासाठी पत्नी, मुलगा आणि त्यांचे मित्र रामचंद्र सुर्वे हे त्यांच्या स्वत:च्या आल्टो (एमएच 01 बीएफ 7689) कारने आले होते.  मुलीला महाविद्यालयात सोडून ते रविवारी मध्यरात्री परत मुंबईला निघाले होते. डॉ. यशवंत माने यांचा मुलगा ऋषीकेश हा कार चालवत होता. ते जांभूळवाडी नवीन बोगद्याजवळ आल्यानंतर ऋषीकेशचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने समोरील ट्रकला (यु.पी. 25. सी.टी 3612) जोरात धडक दिली. यात यशवंत माने त्यांची पत्नी शारदा, मुलगा ऋषीकेश आणि रामचंद्र सुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. याची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, कार बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक यादव करत आहेत.