होमपेज › Pune › चौकशी समिती उरली चौकशीपुरतीच

चौकशी समिती उरली चौकशीपुरतीच

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:28AM

बुकमार्क करा

पुणे ः लक्ष्मण खोत 

पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये सर्व शिक्षा अभियानच्या युआरसी बँक खात्याचा वापर प्रकल्प अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांच्या सहीने करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित गैरव्यवहारांची चौकशी समिती स्थापन होऊनही पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. दरम्यान, चौकशी समितीच्या अध्यक्षा डिसेंबरअखेर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील गैरव्यवहारांची चौकशी होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पुणे महापालिकेचा शिक्षण विभाग गेली अनेक वर्षे घोटाळे आणि गैरव्यवहारामुळे सातत्याने गाजत आहे. त्यातच विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांद्वारे त्यांच्या सहीने सर्व शिक्षा अभियानचे युआरसी बँक खात्याचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेद्वारे करण्यात आला होता. युआरसी खात्याचा वापर करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची परवानगी आवश्यक असते. समितीमध्ये आयुक्त, संबंधित खाते प्रमुख आणि प्रकल्प अधिकार्‍यांचा समावेश असतो. मात्र, यामध्ये खाते प्रमुख आणि आयुक्तांना अंधारात ठेवत सदर प्रकल्प अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. 

दरम्यान, संबंधित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी 22 जून रोजी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार 23 जून रोजी सदर खात्यांची बँक माहिती, तसेच इतर सर्व खात्याची माहितीसह समिती समोर उपस्थित राहण्याचे आदेश प्रकल्प अधिकारी आणि संबंधित पाच शिक्षकांना देण्यात आले होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांत समितीतील सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे अथवा चौकशी समितीसमोर सादर न झाल्याने चौकशी पुढे सरकलीची नाही. चौकशी समितीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळले जात आहे. त्यातच डिसेंबरअखेर समिती अध्यक्षा निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानाच्या बँक खात्यात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.