होमपेज › Pune › नोटबंदी क्षणात, मग राममंदिर का नाही? : उध्दव ठाकरे

नोटबंदी क्षणात, मग राममंदिर का नाही? : उध्दव ठाकरे

Published On: Jul 14 2018 4:59PM | Last Updated: Jul 14 2018 4:59PMपुणे : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांत भाजपने राममंदिर, समान नागरी कायदा तसेच 370 कलम रद्द करण्याची घोषणा केली होती. सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे त्यावर कार्यवाही होणे आवश्यक होते. मात्र, केंद्रातील सरकारला या घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे नोटबंदीचा निर्णय एका क्षणात लागू केला. त्याप्रमाणे राम मंदिर का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आगामी निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघात युती; तसेच स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत, गजानान किर्तीकर, दगडू सकपाळ, श्रीरंग बारणे, मिलिंद नार्वेकर, नितीन बानगुडे-पाटील, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे , राज्य संघटक गोविंद घोळवे आदी उपस्थित होते.

अपेक्षा पूर्ण करणार्‍यांच्या मागे जनता उभी राहते. स्वार्थासाठी आम्ही भांडत नाही, सरकारमध्ये असताना ज्या गोष्टी पटल्या नाही, त्या गोष्टींसाठी आणि जनतेच्या हितासाठी आम्ही भांडतो, असे त्यांनी सांगितले.