होमपेज › Pune › बिटीमधील दोष दूर न केल्यास कापसावर संकट : शरद पवार 

बिटीमधील दोष दूर न केल्यास कापसावर संकट : शरद पवार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यात ऊसानंतर कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, कापसावरील  बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे चालूवर्षी मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत बिटीमधील दोष तत्काळ दूर केला नाही तर पुढील वर्षी विदर्भ, मराठवाडा व खान्देशात कापुस उत्‍पादक शेतकर्‍यांसाठी गंभीर समस्या निर्माण होईल, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. सेंद्रिय शेती उत्पादन आरोग्यासाठी महत्वाचे असून, त्याचे ब्रॅण्डिंग करुन मालविक्रीसाठी शेतकर्‍यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

सृष्टी ऑरगॅनिक्स अ‍ॅग्रो प्रॉडक्टस अ‍ॅण्ड सर्व्हिसेसच्या वतीने सेंद्रीय फळे भाजीपाला व अन्नधान्याच्या थेट विक्री केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते कर्वे रोड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा रोग येवून पिकाचे नुकसान झाले आहे. अमेरिकेतील मॉनसॅन्टो कंपनीच्या बीटी वाणाची प्रतिकार क्षमता कमी होत चालली आहे. यासाठी 17 डिसेंबर रोजी नागपूर येथे केंद्राचे कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ज्ञ, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, कापसाचे प्रगतीशील दोनशे शेतकरी आणि मी स्वतः एक बैठक घेवून पुढील वर्षाच्या नियोजनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. यवतमाळ येथील शेतकर्‍यांचे मृत्युमुळे मी तेथे भेट दिली. त्यावेळी काळजी न घेता चुकीच्या पद्धतीने केलेल्या औषध फवारणीमुळे हे झाल्याचे समोर येत आहे. याबाबत संबंधित किटकनाशकांची हैदराबाद येथे तपासणी करून संबंधित औषधांवर बंदी आणण्यासाठी निर्बंध लावले पाहिजेत.

आरोग्याकडे लक्ष ठेवून एक वेगळा रस्ता म्हणून सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल. मात्र, त्यातून देशाच्या एकूण गरज भागणार नाही. त्यावर जेनेटिकली मॉडिफाईड तथा जी.एम. पिकांचा विषय पुढे येतो. पंरतु त्यावर टीका होते. शेतकर्‍यांनी पिकविलेल्या सेंद्रिय शेतीमालाची विक्री केंद्रे साखर संकुल, मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी आणि हिंजवडी येथे येत्या एक ते दीड महिन्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. 

जमिनीचा पोत खालावला...

रासायनिक खते आणि औषध फवारणीमुळे आपण जमिनीचा पोत खालावून बसलेलो आहोत. उत्पादनात वाढ झालेली असली तरी जमिन आम्ही खराब केलेली आहे. मात्र, ज्या जमिनीत शेणखताचा वापर आणि मेंढरं बसवून लेंडी खत वापरलेल्या जमिनीचा पोत चांगला राहिलेला आहे. दरम्यान कापसाचे भाव कमी असल्याबद्दल शेतकर्‍यांनी विचारले असता, पवार म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी लागेल. इथे राजकारण आणणार नाही. शेतकर्‍यांचे प्रश्‍न हाताळण्यावर मी बोलेल.