होमपेज › Pune › विक्रमने बॅरिस्टर बसवावे; मी त्यात काम करेन : नाना पाटेकर

विक्रमने बॅरिस्टर बसवावे; मी त्यात काम करेन : नाना पाटेकर

Published On: May 03 2018 8:00PM | Last Updated: May 03 2018 8:00PM



पुणे : प्रतिनिधी

विक्रम गोखले फार मोठा नट आहे. राजदत्त हे मला वडलांच्या ठिकाणी आहेत. विक्रमसमोर नम्र होता येत आहे याचा मोठा आनंद आहे. नटसम्राट विक्रमने केला असता तर एक वेगळा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला असता. विक्रम संवादामध्ये जे विराम घेतो त्यात तो खूप काही सांगून जातो. डॉक्टरांच्या नटसम्राटाची आणि विक्रमच्या बॅरिस्टरची आम्ही पारायणं केली आहेत. विक्रमने बॅरिस्टर बसवावे; मी त्यात काम करेल, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

संवाद पुणेतर्फे संवाद मराठी चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना किरण शांताराम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते मनोज जोशी, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, किरण शांताराम, अशोख विखे पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे सचिन इटकर, संवादचे सुनील महाजन उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना नाट्य आणि चित्रपट सृष्टीत पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

राजदत्त म्हणाले, मी काय केलं याच नेमकं उत्तर मला सांगता येत नाही. असे पुरस्कार ऊर्जा देण्याकरिता असतात. पूर्वी दिग्दर्शक या नात्याने मी नानांना खाली पाहायचो. आज नाना कुठल्या कुठे गेला. माझी मान वर जाते आणि नाना मला वर दिसतो. पुरस्कार ही आमची भूक असते. हा सत्कार आमच्या कलाकारांची जगण्याची गरज आहे. सौभाग्यवतीला मंगळसूत्र दाखविताना जो आनंद होईल तोच आनंद मला पुरस्कार स्वीकारताना होतो. कला या क्षेत्रावर आपले असेच प्रेम राहायला हवे. सर्व कलांचा उद्देश माणसाला आनंद देणं आणि वाट दाखवीण हा असतो.

विक्रम गोखले म्हणाले, अशा सन्मानाने अधिक जवाबदारी येऊन पडते. नाना बरोबर प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे. फार मृदू माणूस आहे. अत्यंत प्रेमळ आणि विचारी माणूस आहे. सर्व सामान्य माणसाला नाना कळणार नाही. माणूस म्हणून तो आधी आवडतो आणि त्यानंतर नट म्हणून आवडतो. समोरच्या कलाकाराचं कौतुक करण्याची वृत्ती त्या माणसाकडे आहे. मी सैनिका करीता काम करतो आणि तो शेतकऱ्यांकरिता काम करतो.

वामन केंद्रे म्हणाले, आपण योग्य दिशेने काम करतो आहे याचा आत्मविश्वास वाढतो. मराठी नाटक हे राज्याच्या बाहेर जाण ही काळाची गरज आहे. मला मराठी नाटक करता करता भारतीय नाटक समजलं. या नाटकाची समृद्धी कळली. मी संचालकपदी नियुक्त झाल्यावर इतर देशातील विद्यापीठांचा अभ्यास केला. त्यानंतर, ३ ते ५ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या भारतीय नाट्यसृष्टीच वास्तव पुढे आले. भारतीय संस्कृती समृद्ध असताना सुद्धा भारताच्या बाहेर त्याची व्याप्ती पोहोचलेली नाही. त्यावर विचार करण्याची गरज पडते. भारताची रंगभूमीवरील संस्कृती भारताबाहेर सर्व सामर्थ्याने मांडली गेली पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा दामले यांनी केले.