Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Pune › लग्नापूर्वी अन् नंतरही वाढतेय हेरगिरीचे पेव

लग्नापूर्वी अन् नंतरही वाढतेय हेरगिरीचे पेव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात उच्चशिक्षित व मध्यमवर्गीय लोकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. सध्या ऑनलाईन विवाह जमण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. टेक्नोसॅव्ही युगात उच्चशिक्षित तरुण-तरुणींची लग्ने वेगवेगळी विवाह संकेतस्थळे किंवा नातेवाइकांमार्फत जुळविली जातात; मात्र वेळेचा अभाव व त्या ठिकाणी राहत नसल्याने संबंधित जोडीदाराची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांचा आधार घेतला जात आहे. 

काही वर्षांपूर्वी लग्न जमविताना नातेवाईक मध्यस्थी करत असत; त्यामुळे वधू-वराबाबत खात्रीलायक माहिती त्यांच्याकडे असायची; मात्र आता तरुण किंवा तरुणी शिक्षण, नोकरीनिमित्त मोठ्या शहरात राहत असल्याने त्यांच्याबद्दलची माहिती नातेवाइकांना नसते. लग्न जमल्यानंतर कधी-कधी वेगळीच माहिती समोर येते. विदेशात राहणारे तरुण-तरुणी यांच्या लग्नाच्या वेळी वधू, वरापैकी एकाकडून फसविल्या जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत; त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी लग्नाआधीची माहिती काढण्यासाठी शहरांमधील हेरांची मदत घेऊन तो किंवा ती  करत असलेली नोकरी, त्यांचे शिक्षण आणि त्यांचे कुठे अफेअर सुरू नाही ना, याची खातरजमा केली जाते.

तर वर पक्षाकडून मुलगी काय करते, तिचे शिक्षण खरे आहे का, तिचे मित्र किती, कोण आहेत; तसेच तिचे चारित्र्य याबाबत माहिती काढली जाते. जोडीदारावर संशय काही दशकांपूर्वी लग्न जमविताना नातेवाइकांवर मदार असायची. त्यांनी खात्री दिली की लग्नगाठ पक्की केली जात असे.  पती दिवसभर कामावर जातो. त्यानंतर पत्नी कुणाला भेटते... किंवा ती सध्या काय करते याबाबत जर संशय आला तर पती तिच्या मागावर हेर लावून तिची माहिती घेतात.  संशयाचे मानगुटीवर बसलेले भूत संसारात बिब्बा कालवते आणि दहा-पंधरा वर्षे गुण्यागोविंदाने सोबत राहिलेल्या जोडप्यामध्ये वितुष्ट वाढते. परिणामी पत्नीही पतीचे कामाच्या ठिकाणी 

किंवा अन्यत्र काही सुरू नाही ना याची खातरजमा करण्यासाठी मागावर गुप्तहेर लावते. काही वर्षांपासून उच्चभ्रू वर्गातच अशा प्रकारे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेतली जात आहे. आता याचे लोण मध्यमवर्गीयांमध्येही फोफावते आहे. लग्नानंतर पती किंवा पत्नीची माहिती काढून त्यांना सोडचिठ्ठी देण्यासाठी पुरावे गोळा केले जातात.  त्यानंतर ही माहिती घटस्फोटाच्या केसमध्ये पुरावे म्हणून वापरली जाते. काही वेळा पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी मिळविण्यासाठीही या माहितीचा वापर केला जातो. पतीकडून तिला पोटगी देणे कसे टाळता येईल यासाठी पुरावे गोळा केले जातात, अशी माहिती एका डिटेक्टिव एजन्सीने दिली. मुलांवरही लक्ष 

आपली मुले शाळा-महाविद्यालयात जाण्याच्या बहाण्याने कुठे जातात का याचा मागोवा पालकांना घ्यायचा असतो. आई-वडील दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात; त्यामुळे ते आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकत नाहीत. त्यामुळे मुले खोटे बोलून पबमध्ये जाणे, मित्र-मैत्रिणींसोबत तर जात नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी आई-वडील आपल्या मुलांवर हेरांमार्फत लक्ष ठेवतात, अशी माहिती खासगी गुप्तहेर एजन्सीच्या काही सदस्यांनी दिली.