होमपेज › Pune › भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंना सरकारचा छुपा पाठिंबा

भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंना सरकारचा छुपा पाठिंबा

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 1:39AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

सरकार आणि तथाकथित इतिहासकार हे इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी आधीपासूनच कोरेगाव-भीमा परिसरात जाऊन समाजाला भडकावणारी भाषणे करीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सरकारचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याचा आरोप सत्यशोधन समितीचे डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. कोरेगाव-भीमा घटनेचा शोध घेण्यासाठी सत्यशोधन समिती नेमली असून, डॉ. भारत पाटणकर, प्रा. भीमराव बनसोडे, प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी करून तेथील गावकर्‍यांशी बोलून निरीक्षणे आणि निष्कर्ष अहवाल तयार केला आहे.  डॉ. पाटणकर म्हणाले, वढू गावातील घटना गंभीर होती.

पण, आता गावकर्‍यांमधील गैरसमज दूर झाले असून, ग्रामस्थांनी सलोख्याचा करार केला आहे. हा पूर्वनियोजित कट होता. विशिष्ट विचारधारा थोपण्यासाठी भिडे, एकबोटे ‘मास्टरमाईंड’ होते. सध्याचे सरकार आणि तथाकथित इतिहासकार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व घटनेला सरकारचीही मूकसंमती आहे. परंतु, या नीतीला महाराष्ट्रातील लोक बळी पडणार नाहीत.
दगडफेकीमागे स्थानिक गावकर्‍यांचा सहभाग नव्हता. पोलिसांनीही याबाबत बघ्याची भूमिका घेतली. आता महाराष्ट्र शासनाने विनाविलंब न्यायालयीन चौकशी करून चिथावणी देणार्‍यांवर तसेच जाळपोळ करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. पाटणकर यांनी या वेळी केली.