होमपेज › Pune › प्रेमाला नकार देणार्‍या तरुणीचे फेसबुकवर उघडले बनावट खाते

प्रेमाला नकार देणार्‍या तरुणीचे फेसबुकवर उघडले बनावट खाते

Published On: Mar 05 2018 1:57AM | Last Updated: Mar 05 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी 

प्रेमाला नकार देणार्‍या तरुणीचे फेसबुकवर एका मुलीच्या नावाने बनावट अकाउंट उघडून त्याद्वारे तिची बदनामी केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अमर रघुनाथ जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात 19  वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा आहे.

तो तरुणीला काही दिवसांपासून त्रास देत होता. त्याने तरुणीला प्रेमाची मागणी घातली. पण, तिने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिचे फेसबुकवर दुसर्‍याच मुलीच्या नावाने बनावट अकाउंट सुरू केले. त्या अकाउंटवर तिचा फोटो टाकला. त्यावर बदनामीकारक मजकूर टाकला. तसेच, तो व्हायरल करून तिची बदनामी केली. तरुणीला हा प्रकार समजल्यानंतर तिने डिसेंबर 2017 मध्ये सायबर सेलकडे तक्रार दिली होती.   तपास केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल  केला. 

विनयभंग करणार्‍याला कोठडी

 एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणार्‍याला येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. अक्षय सतीश चांडालिया (19, रा. जयजवाननगर, गुरुद्वारा चौक, येरवडा, सध्या रा. ईस्क्वेअर थिएटरजवळ, चतुःश्रृंगी) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन महिन्यांपासून अक्षय हा पीडित मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढून, तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, त्याच्याकडे पीडिता दुर्लक्ष करत होती. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अक्षयने तिला रस्त्यात अडविले. धमकी देऊन त्याच्या जवळ असलेल्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर तो तिला चतुःश्रृंगी येथील ईस्क्वेअर थिएटर येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिला तू माझ्याशी प्रेम कर, नाही तर मी माझे काहीही करून घेईन, अशी धमकी दिली. याप्रकरणी अक्षयला अटक  केली. अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी  काम पाहिले.