होमपेज › Pune › शतकोत्तर रौप्यमहोत्सव गणेशोत्सवाची चौकशी करा

शतकोत्तर रौप्यमहोत्सव गणेशोत्सवाची चौकशी करा

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:12AMपुणे  : प्रतिनिधी

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने दोन कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. वास्तविक पाहता कोणतेही नियोजन नसताना घाईघाईत हा प्रकल्प राबविण्यात आला असून, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्वरित त्याचे सर्व पुरावे सादर करून चौकशी समिती नेमावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुणे महापालिकेसमोर महाआरती आणि धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्‍त कुणाल कुमार यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, ज्योतिबा नरवडे, शहर संघटक सुभाष जाधव, सिध्दार्थ कोंढाळकर, संजय चव्हाण, सुरेखा जुजगर, कुमार गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या उषा पाटील, मीनल कडू, रेश्मा पाटील, दीपा माने आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

उपक्रमांच्या खर्चासंदर्भातील बिले, तसेच उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ, पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचा पाठपुरावा सुरू आहे, परंतु महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहेत. शाडू मातीचे गणपती बनविण्यासाठी आलेले तीन हजार विद्यार्थी उपाशीपोटी घरी गेले आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचा खर्च दाखविण्यात आलेला आहे. स्मार्ट पुणे सोसायटी स्पर्धेबाबत काहीच माहिती मिळत नाही, सात लाख रुपये मोजूनही गिनिज बुक रेकॉर्ड झालेले नाही; तसेच ढोल-वादन स्पर्धा झाली नाही, मात्र त्यासाठी 13 लाख रुपये मंडपासाठी खर्च झालेले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी समितीमार्फत  चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही सुभाष जाधव यांनी या वेळी केली.