होमपेज › Pune › मंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते - रामराजे नाईक निंबाळकर

मंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते - रामराजे नाईक निंबाळकर

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी 

जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला तरी महाविद्यालयात पाऊल ठेवतो तेव्हा त्याला आनंदच होतो. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा दहावीचा निकालही लागलेला नव्हता. विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही महिने इंग्रजीत काय शिकविले जात आहे ते कळले नाही... अशी मिस्कील टिप्पणी करत ‘मंत्र्यापेक्षा सभापतिपद मला आवडते. सभागृहात बस खाली... हो बाहेर..असं कमी शब्दात बोलावं लागतं. त्यामुळे लोकशाहीतील सर्वात आनंददायी असणार्‍या पदावर बसण्याचा मान मिळाला आहे,’ अशी फटकेबाजी करत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुधवारी धमाल उडवून दिली.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या द फर्ग्युसोनियन्स संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मेजर जनरल माधुरी कानिटकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, द फर्ग्युसोनियन्सचे चेअरमन विजय सावंत, अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आकांक्षा बुचडे आणि टेनिसपटू शिवानी इंगळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

नाईक निंबाळकर म्हणाले, की फर्ग्युसनची कुठली आठवण सांगू, हे सध्या कळत नाही. तासिका सुरू असताना मोठ्या खिडक्यांमधून पळून जाणे, कट्ट्यावर बसून वडापाव खात गप्पा मारणे, होस्टेलचे दिवस, वैशाली हॉटेलमधील डोसा की वडाच्या झाडाची आठवण सांगायची, हे समजत नाही. मात्र, इथे आल्यानंतर या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने इंग्रजी काही समजले नाही. मात्र, त्यानंतर सवय झाली. दोन पदव्या या महाविद्यालयातून घेतल्या. त्यावर ग्रामीण भागातील विधि महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे काम केले. त्यामुळे मी मूळचा शिक्षकच. अपघाताने राजकारणात आलो. आजही मला शिकवायला आवडेल.

फर्ग्युसन महाविद्यालयाने मला दोन महिने विद्यार्थ्यांना शिकविण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्यांना कंटाळा येणारे विषय मी चांगले शिकवू शकेन. आयुष्याची संध्याकाळ आनंदात जावी, असेच चांगले काम करायचे आहे. त्यासाठी लोकांसाठी करता येणारी चांगली कामे राजकारणाच्या माध्यमातून करीत आलो आणि करीत राहणार आहे. जोशी म्हणाल्या, की सुमारे 45 वर्षांपूर्वी नाटकात काम करणे, हा खूप मोठा प्रश्न होता. मात्र, त्यावेळी माझ्या वडिलांनी नाटकात काम करण्यासाठी पाठिंबा देत प्रशिक्षणासाठी दिल्लीत पाठविले. आज अशी परिस्थिती आहे की, प्रत्येक विद्यापीठात ड्रामा स्कूल आहे. त्यामुळे आम्ही त्या काळापासून केलेल्या कामाची पावती आज मिळाली आहे. आजचा पुरस्कार खूप वेगळा आहे. माझ्यासारख्या एका नाटकवेडीला नाट्यसृष्टीत कामगिरी केल्याबाबत हा पुरस्कार दिल्याने अधिक आनंदी झाले आहे. प्रा. ताकवले यांनी नव्या शिक्षण पद्धतीवर मार्गदर्शन केले. डॉ. करमळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सावंत यांनी प्रास्ताविक केले.