Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Pune › फॅशन स्ट्रीट वर कारवाई होणारच

फॅशन स्ट्रीट वर कारवाई होणारच

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 1:00AMपुणे :प्रतिनिधी 

महापालिकेच्या अग्निशामक दलाचे फॅशन स्ट्रीट बाबत दिलेला धोक्याचा इशारा ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता फॅशन स्ट्रीट मध्ये असलेल्या अनधिकृत गाळेधारकांवर कारवाई होणारच, असा निर्णय सोमवारी पार पडलेल्या कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

दरम्यान गाळेधारकांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांना 8 फेब्रुवारीपर्यत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. तर प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांना 10 फेब्रुवारीपर्यत अनधिकृत गाळ्यांची माहिती जमा करण्याचे आदेश ब्रिगेडिअर राजीव सेठी यांनी दिले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव शेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन.यादव, उपाध्यक्ष  अतुल गायकवाड यांच्यासह नगरसेविका रूपाली बिडकर, अशोक पवार , दिलीप गिरमकर, विवेक यादव , विनोद मथुरावाला, किरण मंत्री आणि प्रियंका श्रीगिरी उपस्थित होते. 

एम. जी. रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांचे 1997 साली स्थलांतर करण्यात आले. प्रशासनाने प्रत्येकास 5 बाय 4 असा गाळा उपलब्ध करून दिला. त्यानुसार सुमारे 565 गाळे अ‍ॅग्रीमेंटनुसार संबधितांना देण्यात आले; मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षात कोणत्याही अधिकार्‍याने तसेच लोकप्रतिनिधीने लक्ष न दिल्यामुळे फॅशन स्ट्रीटमध्ये अनधिकृत गाळेधारकांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे.  तसेच ज्यांच्या नावावर ओटा आहे. त्यांनी तो भाड्याने तरी  दिला आहे किंवा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता विकला आहे.

त्यामुळे या भागात दुकानांची मोठ्या प्रमाणावर गर्दी  झालेली आहे. ‘फॅशन स्ट्रीट’ भागात असलेल्या दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी आहे .मात्र रात्री उशीरापर्यत सुरू असते. तसेच  ठरवून दिलेल्या जागेपेक्षा जास्त दुकाने या भागात आहेत.  फायर ऑडिटनुसार हा भाग धोकादायक असल्यामुळे त्यावर कारवाई करणे अतिशय महत्वाचे आहे. मात्र तरी देखील  या भागात असलेल्या दुकानादारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारीपर्यत या दुकानदारांच्या असलेल्या संघटनांच्या पदाधिका-यांनी  प्रशासनाकडे म्हणने मांडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

याबाबत बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव शेठी म्हणाले, “ फॅशन स्ट्रीट हा भाग अतिशय धोकादायक झालेला आहे.आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यामुळे नियमानुसार कारवाई होणे गरजेचे असून ती करण्यात येणार आहे.  तत्पूर्वी  या भागात असलेली दुकाने कोणाच्या नावावर आहेत. याची माहिती  घेण्यात येणार आहे.