Mon, Jun 24, 2019 16:34होमपेज › Pune › ’एफसीएफएस’ दुसरी फेरी उद्यापासून

’एफसीएफएस’ दुसरी फेरी उद्यापासून

Published On: Sep 03 2018 1:44AM | Last Updated: Sep 03 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी 

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आता ’एफसीएफएस’ दुसरी फेरी उद्या दि.4 सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. या फेरीत फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच एटकेटीसह अन्य प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ’प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक  शिक्षण उपसंचालक कार्यालयातून जाहीर करण्यात आले आहे.

अकरावी प्रवेशासाठी एकूण चार गुणवत्ता याद्या, एक विशेष फेरी व एक प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य अशा एकूण सहा फेर्‍या घेण्यात आल्या आहेत. या फेर्‍यांमध्ये तब्बल 90 टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. दरम्यान 29 ऑगस्ट रोजी दहावी फेरपरीक्षेचा निकाल लागला आहे. त्यानुसार फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, एक किंवा दोन विषयातील अनुत्तीर्ण विद्यार्थी, तसेच अद्यापपर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

दुसर्‍या फेरीसाठी विद्यार्थ्यांची तीन गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार 60 ते 100 टक्के गुण असलेले विद्यार्थी पहिल्या गटात, 35 ते 100 टक्के गुण असलेले विद्यार्थी दुसर्‍या गटात तर पहिल्या दोन गटातील विद्यार्थ्यांसह फेरपरीक्षेतील उत्तीर्ण तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा तिसर्‍या गटात सहभाग करण्यात आला आहे.

या फेरीच्या प्रवेशासाठी 5 सप्टेंबर रोजी पहिल्या गटासाठी रिक्त जाहीर करण्यात येतील. 6 व 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या कार्यपध्दतीनुसार या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करण्यात येतील. दि.7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दुसर्‍या गटासाठी रिक्त जागा जाहीर करण्यात येतील. दि.8 ते 10 सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. दि.10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता तीसर्‍या गटासाठी रिक्त जागा जाहीर करण्यात येतील. दि.11 व 12 रोजी तिसर्‍या गटातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असल्याची माहिती प्रवेश समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.