Tue, Apr 23, 2019 18:21होमपेज › Pune › पर्यावरण विकास आराखडा तयार नसल्याचे उघड

पर्यावरण विकास आराखडा तयार नसल्याचे उघड

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:29AMमुंढवा : नितीन वाबळे

गावाच्या विकासासाठी पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामयोजनेअंतर्गत शासकीय विभागाचे कार्यक्रम आणि योजना यांचा समन्वय साधून एकात्मिक विकास आराखडा बनविणे गरजेचे आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सहभागातून विविध योजनांमधून ग्रामविकासाची संकल्पना अंमलात आणण्यासाठी शासनाने ही योजना राबविण्याच निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी केशवनगर ग्रामपंचायतीने विकासआराखडा तयार केला नसल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघड झाले आहे. या योजणेच्या अनुदान वाटपाच्या निकषानुसार ग्रामपंचायत हद्दिमध्ये पहिल्या वर्षी लोकसंख्येच्या किमान 50 टक्के झाडे लावून ती जगविली पाहिजेत.

त्यानंतर पुढील दोन वर्षांत 50 टक्के झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची हमी ग्रामपंचायतीने दिली पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात ही झाडे कोठे लावली, त्यांचे संगोपन व निगा आदि पतशीलांबाबत ग्रामपंचायतीमध्ये नोंदवही ठेवली नसल्याचे लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 नुसार ग्रामिण भागात मोबाईल टॉवर व अन्य व्यवसाय कंपन्यांकडून उभारण्यात येणा-या मनो-यांवर कर आकारणी करणे आवश्यक आहे.

मात्र, त्यांसंबंधी कर आकारणी झाली नाही. यातील नियम 7 प्रमाणे ग्रामपंचायत हद्दिमधील मोकळ्या जागेवर कर आकारणी करणे आवश्यक असतानाही कर आकारणी केली नाही. तसेच मुंबई मुद्रांक शुल्क अधिनियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क भरल्याची खात्री केली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
केशवनगर ग्रामपंचायत हद्दिमध्ये ग्रामपंचायतीचे व्यावसायीक गाळे, अंगणवाडी, हॉल तसेच टेरेसवरील कार्यक्रमाची कुठेही नोंद दाखविली नाही. तसेच लघुउद्योग, गोडाऊन, बिस्कीट, चॉकलेट, वर्कशाप असे काही व्यवसाय आहेत.

त्यासाठी ग्रामपंचायतीने एनओसी दिली आहे. या उद्योजकांकडून करआकारणी करून ती वसूल करणे आवश्यक होते. मात्र, ग्रामपंचायतीने या तक्त्यांमध्ये निरंक असे दाखविले आहे. यांच्याकडून कर आकारणी का केली नाही, ती केली असेल तर का दाखविली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.