Tue, Jul 16, 2019 02:11होमपेज › Pune › जिल्हा परिषद सदस्यांच्या  कामांवर आमदार झाले ‘हावी

जिल्हा परिषद सदस्यांच्या  कामांवर आमदार झाले ‘हावी

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

जिल्हा परिषद सदस्यांच्या आर्थिक फंडातून मंजूर झालेल्या  विकासकामांच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातील अनेक आमदार हावी झाले आहेत. त्यामुळे अनेक सदस्यांच्या मतदारसंघातील  भूमिपूजनांवर आमदारांची छाप वाढली आहे. जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उचित मानसन्मान मिळत नाही. 
त्यामुळे सदस्यांनी चक्क सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद कामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते न करण्याचा ठराव मांडून तत्काळ मंजूर केला. त्यामुळे ठरावाची 
अंमलबजावणी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांच्या समन्वयाने होणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या सदस्यांकडून मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये शाळा इमारत उभारणी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी इमारत, ग्रामीण मार्ग रस्ते सुधारणा, इतर जिल्हा मार्गाच्या कामांना गती दिली जाते.  मात्र, अशा कामांच्या भूमिपूजनाला आणि उद्घाटनला संबंधित तालुक्याच्या  आमदारांशिवाय पूर्णत्व प्राप्‍त होत नाही. त्यामुळे काही आमदारांकडून स्वपक्षीय तसेच विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदारसंघात छाप पाडण्यासाठी आणि त्यांची कोंडी करण्यासाठी उद्घाटनाअभावी कामे साठविली जात आहेत.

तसेच आमदारांच्या सोयीनुसार फंडांतर्गत मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन एकाच दिवसात उरकले जात आहे. उद्घाटन समारंभात  मान-अपमान नाट्यामुळे  जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजीचा  सूर उमटला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 5 जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी आमदारांचा हस्तक्षेप नको असल्यामुळे ठराव एकमताने मांडण्यात आला. 

त्यास सर्वपक्षाच्या सदस्यांनी  एकमुखाने मान्यता देत सदस्यत्व पदाचे अस्तित्व जपण्यास प्राधान्य दिले आहे.जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते टाळण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, विकासकामांच्या उद्घाटनासाठी आमदारांना न बोलविल्यास त्याचा वचपा काढण्यासाठी आमदार फंडातून केल्या जाणार्‍या कामांना कायमची तिलांजली मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.