Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Pune › धर्मा पाटील यांना न्याय मिळणार का

धर्मा पाटील यांना न्याय मिळणार का

Published On: Feb 06 2018 1:54AM | Last Updated: Feb 06 2018 1:52AMपुणे  ; प्रतिनिधी 

शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात मानवी हक्‍क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला असतानाही आयोगाकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही. यामध्ये मानवी हक्‍क संरक्षण आयोगाच्या विधि चौकशी केंद्राने या प्रकरणात पंधरा दिवसांनी चौकशी करण्यास सांगितले आहे. एकीकडे मृत्यूपूर्वी धर्मा पाटील यांना न्याय मिळाला नाही. मृत्यूनंतरही आयोगाकडून तक्रारीची दखल घेण्यास विलंब होत असल्याची माहिती अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.   

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य मानवी हक्‍क संरक्षण आयोगाकडे राज्य सरकारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राकेश माळी, दीपक चटाप, वैष्णव, इंगोले, आमिर शेख, प्राजक्‍ता झलके या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका आयोगाकडे दाखल केली आहे. आयोगाने मानवी हक्‍क संरक्षण कायद्यानुसार पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, या प्रकरणात घटना संशोधन समिती नेमण्यात यावी, यामध्ये विधि व मानवाधिकार  क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्‍तींचा समावेश करण्यात यावा, या समितीमध्ये याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधी असावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे आयोगाचे न्यायमूर्ती एस. आर. बन्नूरमाथ यांच्याकडे करण्यात आली असल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. 
दि. 2 डिसेंबर 2017 रोजी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पर्यटनमंत्री यांना निवेदन दिले होते.

त्यामध्ये त्यांनी योग्य न्याय न मिळाल्यास आत्महत्येस सरकार जबाबदार असेल असे म्हटले होते. त्यांच्या शेतातील फळझाडांचा त्यांना मोबादला मिळाला नाही. उलट शेजारच्या शेतकर्‍याने एजंटामार्फत प्रक्रिया केल्याने त्यांना फळझाडांचा मोबदला मिळाला. पाटील यांना केवळ चार लाखांचा मोबदला देण्यात आला. या भेदभावामुळे व्यथित झालेल्या धर्मा पाटील यांनी वारंवार मंत्रालयात चकरा मारल्या तरीही दाद न मिळाल्याने शेवटी मंत्रालयातच विष प्राशन केले.  

या प्रकरणात भारतीय नागरिकाच्या सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्‍लंघन झाले आहे. हे उल्‍लंघन सरकारी यंत्रणेमार्फत झाले असल्याने, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूलमंत्री, ऊर्जामंत्री, पर्यटनमंत्री यांना या प्रकरणात जबाबदार धरण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामध्ये पाटील यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून दंड वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. फळबागेचा न मिळालेला मोबदला आणि दंड अशी पाच कोटी रक्‍कम कुटुंबीयांना देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

  मानवी हक्‍क संरक्षण आयोगाकडून अद्यापही तक्रारीची दखल नाही 

अ‍ॅड. असीम सरोदे यांचा आरोप

धर्मा पाटील यांच्या मृत्यू प्रकरणात मानवी हक्‍कांचे उल्‍लंघन झाल्याने यामध्ये मानवी हक्‍क संरक्षण आयोगाने स्वतः कारवाई करण्याची गरज होती. राज्यातील इतका महत्त्वाचा विषय असताना, अजूनही पावले उचलली जात नाहीत. उलट आयोगाच्या विधि चौकशी केंद्राकडून पंधरा दिवसांनी चौकशी करा, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृत्यूपूर्वी न्याय न मिळालेल्या धर्मा पाटील यांना मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 

  -अ‍ॅड. असीम सरोदे