Thu, Mar 21, 2019 11:19होमपेज › Pune › दिपाली कोल्हटकर खून प्रकरणी गुढ कायम

दिपाली कोल्हटकर खून प्रकरणी गुढ कायम

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून सर्व शक्यतांचा विचार करून तपास सुरु आहे. मात्र खुनाचा उद्देश्य अद्याप स्पष्ट झाला नसल्याने गुढ कायम आहे. नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर (वय 70), त्यांची पत्नी दिपाली आणि त्यांच्या मातोश्री आशा सहस्रबुद्धे एरंडवणे भागातील गुळवणी महाराज पथ परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहतात. दिलीप कोल्हटकर आजारपणामुळे मागील तीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. गुरुवारी (दि. 9) सायंकाळी कोल्हटकर, त्यांची पत्नी दीपाली आणि सासू आशा असे तिघे घरी होते.

त्यावेळी स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने आशा यांनी पाहिले. तेव्हा आशा यांना स्वयंपाकघरात दिपाली संशयास्पदरित्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी स्वयंपाकघरातील निरांजन जमिनीवर पडले होते. स्वयंपाकघरात आग लागल्याने दीपाली यांचा होरपळून मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांना होता. मात्र ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

त्यावेळी दीपाली यांचा गळा दाबून तसेच त्यांच्या डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार करून खून करण्यात आल्याचे अहवालात आले. दरम्यान दिपाली यांचा गळा आवळून डोक्यात मारत पुरावा नष्ट करण्यासाठी  दीपाली यांना पेटवून खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कोल्हटकर दाम्पत्याचा मुलगा अन्वय हा अमेरिकेत आहे. त्याला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो शनिवारी पुण्यात पोहोचला. दीपाली यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हटकर यांचे आप्तेष्ट उपस्थित होते.