Thu, Apr 25, 2019 03:50होमपेज › Pune › दुग्ध व्यवसाय अडचणीत

दुग्ध व्यवसाय अडचणीत

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:45AMबारामती : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील शेतीला पूरक असणारा दूध व्यवसाय अपेक्षित दर मिळत नसल्याने सध्या अडचणीत आला असून, दूध उत्पादकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  शासनाने दुधासाठी प्रतिलिटर 27 रुपये दर जाहीर केला असला तरीही बारामती आणि इतर तालुक्यांतील सहकारी व खासगी दूध संस्था मात्र 19 ते 21 रुपये या दरावरच दूध उत्पादकांची बोळवण करत आहेत.  संघ अथवा खासगी संस्था त्यांच्याच अडचणी सांगत असल्याने दूध उत्पादकांनाही फारसे ताणून धरता येत नाही.  

दूध उत्पादक शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला;  परंतु दूध उत्पादकांपेक्षा दूध संस्था लाखो रुपये मिळवत असताना दूध उत्पादकांना समाधानकारक दर मिळत नसल्याने दूध धंदा अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यातील खासगी दूध संस्था उत्पादकांना चांगला दर देत असताना बारामती तालुक्यातच दूध दराची एवढी घसरण का,  असा सवाल उत्पादक व्यक्त करत आहेत. 

पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहेत.  गोळीपेंडीचे पोते 1100 रुपयांवर जाऊन  पोहोचले असून, भुश्श्याचे पोतेही 900 रुपयांना घ्यावे लागत आहे.  मका दीड हजार गुंठ्यावर जाऊन पोहोचली असून, कडवळही महागले आहे.  याशिवाय वैरणीसारखा सुका चारा मिळणेही दिवसेंदिवस 
दुरापास्त होत चालले आहे.  साखर कारखाने सुरू असल्याने उसाचे वाढे उपलब्ध होत आहे; परंतु ते जनावरांना कुठवर द्यायचे.  केवळ वाढ्यावर जनावरे दूध देत नाहीत.

 त्यांना अन्य हिरवा व सुका चाराही द्यावा लागतो;  परंतु चा़र्‍याचे दरही वाढले आहेत.  मग दुधालाच दर कमी का,  असा सवाल उत्पादक करत आहेत. सध्या प्रचंड उन्हाळा सुरू झाल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. काही दिवसांतच साखर कारखाने गाळप बंद होत आहे;  त्यामुळे उसाचे वाढेही मिळणार नाहीत.  अशा परिस्थितीत दुधाला चांगला दर मिळाला नाही तर तोट्यातच हा धंदा करावा लागणार आहे. प्रचंड महागाईने जनावरे सांभाळणे कठीण होऊन बसले असून, एकूणच आर्थिक गणित कोलमडून गेले आहे.