Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Pune › डीएसकेंसह पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला 

डीएसकेंसह पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला 

Published On: Apr 27 2018 4:54PM | Last Updated: Apr 27 2018 4:54PMपुणे : प्रतिनिधी

शेकडो नागरिकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. के उर्फ दिपक कुलकर्णी यांना व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाच्या युक्तीवादनंतर विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दोघांचाही जामीन फेटाळून लावला आहे.  

डीएसके यांनी वेगवेगळया कंपन्या स्थापन करताना त्या पब्लिक प्रा.लि. नावाने उभारल्या असून त्याद्वारे भागधारकांकडून पैशांची उभारणी केली आहे. त्यामुळे डीएसके कंपन्याचे खरे मालक नसून ते केवळ विश्‍वस्त असल्याने त्यांनी कंपनी फायद्याचे दृष्टीने निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, पदाचा गैरवापर करत त्यांनी भागधारकांचा पैसा वैयक्‍तिक कारणाकरिता तसेच स्वत: च्या आर्थिक फायद्याकरिता वापरला आहे. विविध कंपन्यांच्या माध्यमातून डीएसके यांनी सुमारे तीन हजार कोटी रूपयांचा घोटाळा केला असल्याचे तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे. त्यांनी केलेला हा गंभीर गुन्हा असून त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी केली होती. न्यायालयाने वेळोवेळी मुदत देवूनही डीएसके 50 कोटी रुपये जमा करू शकले नाही. तसेच त्यांनी वेळोवेळी न्यायालयाची दिशाभूल केली. अशी व्यक्ती जर जामिनावर सुटली तर ती काहीही करू शकते. तसेच त्यांची पळून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी करताना त्यांचा जामीन फेटाळण्याची मागणी केली होती. गुरूवारी 26 एप्रिल रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद  पूर्ण होऊन त्यांच्या जामीनावरील निर्णय शुक्रवारी होणार होता. त्यानुसार न्यायालयाने डीएसके यांचा जामीन फेटाळून लावला आहे. 

बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी पुणे शहरासह विविध ठिकाणी 11 गृहप्रकल्प कार्यान्वित करून, फ्लॅट धारकांना फ्लॅटचा ताबा लवकरच दिला जाईल असे सांगून फ्लॅटचे 70 टक्के बुकिंग घेतले. याद्वारे त्यांनी एकूण 470 कोटी रूपये जमा केले आहे. त्यातील केवळ 170 कोटी रुपये फ्लॅट बांधकामाकरिता खर्च केले, तर उर्वरित 300 कोटी रूपये दस्ताऐवज फेराफार करुन घोटाळा केल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाचे वकील प्रवीण चव्हाण यांनी जामीनाला विरोध करताना गुरूवारी केला होता. तसेच त्यांचा जामीन फेटाळण्याची मागणी केली होती.