Sun, Jan 20, 2019 16:29होमपेज › Pune › डीएसकेंच्या पावणेतीनशे बँक खात्यात केवळ 43 कोटी  पोलिसांची माहिती

डीएसकेंच्या पावणेतीनशे बँक खात्यात केवळ 43 कोटी  पोलिसांची माहिती

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणार्‍या डी. एस. कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यामधील 275 बँक खात्यांत केवळ 43 कोटी 9 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून त्यांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यात मोठी रोकड मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांना होती. परंतु, ही रक्कम पाहून पोलिसही आवाक झाले आहेत.  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला.

अनेक दिवस न्यायालयाकडून मुदत घेऊनही पैसे भरण्यास असमर्थ ठरल्यानंतर दाम्पत्याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात पाहिजे ती माहिती मिळाली नाही. तसेच, डीएसके दाम्पत्याने तपासात सहकार्यही केले नाही. त्यामुळे पोलिसांना जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून तपास करण्यात आला आहे.  दरम्यान, डीएसकेंच्या हजारो ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रारी दिल्या होत्या. यात आतापर्यंत पोलिसांकडे पाच हजाराहून अधिक ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. डीएसके यांनी ठेवीदार तसेच वैयक्तिक लोन व बँक अशा एकूण 4 हजार कोटी रुपयांचे देणे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून तपासात डीएसकें यांच्या घरावर व कार्यालयावर छापा टाकला.

तसेच, कागदपत्रे जप्त केली. तर त्यांची मालमत्ता आणि बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये अनेक ठिकाणच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. काही बँकांकडून त्यांचे कर्ज थकल्याने मालमत्तांचा लिलाव करण्याचे काम सुरू केले आहे. डीएसके यांच्या एकूण 59 कंपन्यामधील 276 बँक खाती गोठविण्यात आली होती. मात्र, त्यात रक्कम किती हे स्पष्ट होत नव्हते. पोलिसांना त्यात मोठी रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, पोलिसांना या खात्यांमध्ये केवळ 43 कोटी 9 लाख रुपयेच असल्याचे सहायक आयुक्त नीलेश मोरे यांनी सांगितले. दरम्यान डीएसके कडेें ठेवीदारांनी ठेवलेले पैसे तसेच बँकांचे कर्ज त्यासोबत वैयक्तिक लोनची रक्कम नेमकी गेली कुठे हे कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे पोलिस आता हे पैसे गेले कुठे याचा तपास करत आहेत.