Mon, Nov 19, 2018 06:37होमपेज › Pune › कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला!

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला!

Published On: Aug 15 2018 1:21AM | Last Updated: Aug 15 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी 

देशातील बँकिंग व्यवस्थेला हादरवून टाकणारा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेवर झाल्याचे समोर आले आहे. हॅकर्सनी शनिवारी व सोमवारी बँकेच्या एटीएम स्विचवर हल्ला करून, सुमारे 94 कोटी 42 लाख रुपयांची ऑनलाईन चोरी केली आहे. 

हॅकर्सनी हा सर्व पैसा 29 देशांतून काढला असून, यातील अडीच कोटी रुपये भारतातून काढण्यात आले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याने देशभरातील बँक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती, तसेच हाँगकाँग येथील ए.एल.एम. टे्रडिंग लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून, असा हल्ला झालेला असला तरी खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याची ग्वाही बँकेने दिली आहे.

याबाबत कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले की, बँकेवर शनिवारी (11 ऑगस्ट) दुपारी सायबर हल्ला करण्यात आला. व्हिसा डेबिट कार्ड आणि रुपे कार्डमधून नेहमीच्या व्यवहारांपेक्षा जास्त व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेकडून व्हिसा डेबिट कार्ड व रुपे डेबिट कार्ड यंत्रणा बंद करण्यात आली. यादरम्यान 2 तास 13 मिनिटांच्या कालावधीत 29 देशांत एटीएमच्या माध्यमातून सुमारे 12 हजार व्यवहार करून 78 कोटींची ऑनलाईन चोरी करण्यात आली. त्याच कालावधीत भारतात रुपे डेबिट कार्डच्या सुमारे 2 हजार 800 व्यवहारांच्या माध्यमातून 2 कोटी 50 लाख रुपयांची चोरी करण्यात आली. तर 13 ऑगस्टला दुपारी 13 कोटी 92 लाख रुपये काही मिनिटांत हाँगकाँगमधील एका खात्यात वळवण्यात आल्याची माहिती काळे यांनी दिली. 

या सायबर हल्ल्यामागे मोठी आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यंत्रणा असल्याचा संशय व्यक्त करून काळे म्हणाले, बँकेच्या सीबीएस सर्व्हरवर हा हल्ला झाला नसून, बँकेतील पेमेंट स्विचवर मालवेयर अ‍ॅटॅक झाला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेला पाचारण करण्यात आले आहे. तसेच सायबर पोलिस, भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुहास सुभाष गोखले (53, रा. कर्वेनगर) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 त्यानुसार अज्ञात व्यक्ती, तसेच हाँगकाँग येथील हॅनशेंग बँकेत खाते असणार्‍या ए.एल.एम. टे्रडिंग लिमिटेड कंपनीच्या विरोधात फसवणूक व आय.टी. अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खातेदारांचे पैसे सुरक्षित!

या हल्ल्याचे वृत्त समजताच खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अनेक खातेदारांनी मंगळवारी बँकेत धाव घेऊन विचारणा सुरू केली. बँकेच्या सीबीएस सर्व्हरवर हा हल्ला झाला नसून, बँकेतील पेमेंट स्विचवर हा हल्ला झाला आहे. बँकेच्या कोणत्याही खातेदाराच्या खात्यातून पैशांची चोरी झाली नाही. सर्व ठेवीदार, गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत, असे काळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तडजोड रकमेतून रक्कम केली आदा

व्हिसाच्या डेबिट कार्डातून चोरी केलेली 78 कोटी आणि रुपे डेबिट कार्डमधून 2 कोटी 50 लाखांची रक्कम बँकेने या कंपन्यांना करारानुसार (टी प्लस वन) आदा केली आहे. बँकेच्या तडजोड खात्यातून ही रक्कम दिली असून, पुढील तपासानंतर याबाबत स्पष्टता येईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.