होमपेज › Pune › अत्याचार करणार्‍या वृत्तीला मारलेच पाहिजे:  अमृता फडणवीस 

अत्याचार करणार्‍या वृत्तीला मारलेच पाहिजे:  अमृता फडणवीस 

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातही बालिकांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बालिकांवर अत्याचार करणार्‍या दानवी प्रवृत्तीला मारले गेलेच पाहिजे. अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आता तसे कडक कायदेही होत आहेत असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
खास महिलांसाठीच्या कपडे व दागिन्यांच्या ‘कुटॉर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या वेळी प्रदर्शनाच्या आयोजक स्मितादेवी पटवर्धन, नैना मुथा, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, उषा काकडे आदि उपस्थित होत्या.

महिलांच्या समस्या व महिला सक्षमीकरणाबद्दल पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, लहान मुलींवरील अत्याचारांच्या बातम्या अत्यंत संतापजनक असून, यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचा दर वाढला आहहे. ते सुचिन्ह आहे. महिलांच्या सक्षमीकरणांसाठी आधी महिलांनी महिलांच्या पाठीशी उभे राहणे फार महत्त्वाचे आहे. महिलांबाबतची सामाजिक मानसिकता बदलणे आवश्यक असून, शिक्षण व मूल्यांच्या रुजवणुकीतून ते शक्य आहे.