Wed, Nov 14, 2018 01:38होमपेज › Pune › कॉसमॉस दरोडाप्रकरणी दोघांना अटक

कॉसमॉस दरोडाप्रकरणी दोघांना अटक

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी 

कॉसमॉस बँक दरोडाप्रकरणी भिवंडी, औरंगाबाद येथून पोलिसांनी दोघांना अटक केली.  फहिम मेहफूज शेख (27, भिवंडी), फहिम अझीम खान (30, औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

मुंबई, इंदूर, कोल्हापूरच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची छायाचित्रे तयार केली होती. त्यावरून ते भिवंडी, औरंगाबाद, विरार, हैदराबाद, तसेच गोव्यातील असल्याचे स्पष्ट झाले होते. दोघा आरोपींनी पाच साथीदारांसह 11 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 3 ते रात्री दहा या वेळेत 95 बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापुरातील एयू स्मॉल फायनान्स, सारस्वत बँक, एसव्हीसीएल, द कमर्शिअल को- ऑपरेटिव्ह, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, एसबीआय, युनियन बँक, पंजाब, महाराष्ट्र, राजाराम बापू या बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले. पाचही आरोपींनी मिळून 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. काही खातेदारांनी खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम काढली. अशा 27 खातेदारांकडून सायबर विभागाने 3 लाख 55 हजार रुपये जप्त केले आहेत. अधिक तपासासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी केली. सायबर क्राईम विभागाच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.