Tue, Mar 19, 2019 11:22होमपेज › Pune › ‘सॅनिटरी नॅपकीन’ विल्हेवाटीची यंत्रणा बाद

‘सॅनिटरी नॅपकीन’ विल्हेवाटीची यंत्रणा बाद

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 12:45AMपुणे : अपर्णा बडे

सॅनिटरी नॅपकीनच्या वाढत्या कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने शहरात 12 ठिकाणी सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावणारी यंत्रणा सुरू केली होती. मात्र यातील केवळ 10  यंत्रणा सुरू आहेत, तर 2 यंत्रणा निविदा कार्यकाळ संपल्याने बंद अवस्थेत आहेत. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या यंत्रणाही सॅनिटरी नॅपकीन व डायपरच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यल्प क्षमतेच्या आहेत. यामुळे शहरात सॅनिटरीच्या कचर्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेष म्हणजे शहरात सार्वजनिक स्तरावर सॅनिटरी विल्हेवाटीची यंत्रणा अपुरी असताना आहे त्या यंत्रणा सक्षम करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. दिवसाला तयार होणारा 10 ते 12 टन सॅनिटरी नॅपकीनचा, डायपरचा 2 ते 5 टन कचर्‍याच्या विल्हेवाटीपासून प्रशासन पळ काढत आहे. अशाप्रकारे महापालिकेला सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीबद्दल असलेली अनास्था चव्हाट्यावर आली आहे. शहरात महापालिकेद्वारे सार्वजनिक स्तरावर एकूण 12 यंत्रणा आहेत.

यातील  येरवडा क्षत्रिय कार्यालय, नगर रोड क्षत्रिय कार्यालय, औंध क्षत्रिय कार्यालय, ढोलेपाटील रस्ता, पोलिस लाईन, घोले रोड, कोथरूड येथील यंत्रणा  श्रीगणेश एंटरप्रायझेस व जाणिव सेवाभावी संस्थेच्या वतीने चालविण्यात येते तर वर्तक गार्डन, पेशवे पार्क, कोरेगाव पार्क, कर्वे रोड, वडगाव शेरी येथील यंत्रणा जनाधार सेवाभावी संस्थेतर्फे चालविण्यात येते. यापैकी कर्वे रोड व वडगाव शेरी येथील यंत्रणा ऑक्टोबर 2017 पासून निविदा संपल्यामुळे बंद अवस्थेत आहेत.

दरम्यान बंद यंत्रणा पुन्हा सुरु  व्हावी यासाठी जनाधार संस्थेने महापालिकेच्या  घनकचरा व्यवस्थापन आयुक्त, नगरसेवक, क्षेत्रिय कार्यालय यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला असून त्यासाठी त्यांना कोणताही योग्य  प्रतिसाद मिळाला नसल्याने हे प्रकल्प अद्यापही बंद अवस्थेत असल्याचे डॉ. राजेश मणेरीकर यांनी सांगितले. मणेरीकर म्हणाले, ‘बंद प्रकल्पामुळे  कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याने सॅनिटरी नॅपकिन्स सध्या कचर्‍याच्या डब्यात, स्वच्छतागृहात, नाल्यात व उघड्यावर पडलेले आढळतात. या कचर्‍याचे विघटन होत नाही आणि  जंतूंची वाढ होते. विघटनाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने कचरावेचकांना हा कचरा उघड्या हाताने वर्गीकृत करावा लागतो. परिणामी कचरावेचकांचे आरोग्य आणि पर्यावरणालाही धोका पोहोचत आहे. प्रकल्पाची क्षमता पूर्णत: वापरली गेल्यास नॅपकीनचा कचरा नष्ट करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.