Thu, Jul 18, 2019 15:00होमपेज › Pune › पुणे महापालिका करणार  गृह खात्याकडे तक्रार

पुणे महापालिका करणार  गृह खात्याकडे तक्रार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालायाने दिले आहेत. मात्र, महापालिकेकडून अनधिकृत जाहिरातधारकांवर  शहर विद्रुपीकरणाअंतर्गत तक्रार देऊनही पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे महापालिकेने आता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची करण्याची मागणी थेट गृह विभागाकडेच करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, महापालिकेच्या नियमानुसार परवानगी घेऊन शहरात जाहिराती  लावता येतात. त्यासाठी 222 रुपये प्रतिचौरस फूट इतके शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून शहरात मोठ्या फ लकांद्वारे अनधिकृत जाहिरातबाजी केली जाते. याबाबत उच्च न्यायालयानेच महापालिकांना अशा अनधिकृत जाहिरातधारकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्याला पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. 

शहरात परवानगी न घेता बेसुमार जाहिरातबाजी करणार्‍या हिसोला इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड (विवो), सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. आणि ओपो मोबाईल एम. यू. प्रा. लि. या कंपन्यांविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम1995 व 1949 चे कलम 244, 245 व जाहिरात व नियंत्रण नियम 2003 नुसार, महापालिकेने या कंपन्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली होती, मात्र, तब्बल तीन महिने उलटून पोलिसांनी या कंपनीवर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यानंतर महापालिकेकडून अनेकदा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकार्‍यांची भेटही घेण्यात आली. मात्र, त्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आता पालिका प्रशासनाने थेट गृह विभागालाच पत्र पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे दौंडकर यांनी सांगितले. 
 


  •