Fri, Apr 26, 2019 03:39होमपेज › Pune › बिल्डर ला ग्राहक मंचाचा दणका

बिल्डर ला ग्राहक मंचाचा दणका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :  प्रतिनिधी 

सदनिकेसाठी तब्बल 7 लाख 35 हजार रूपये भरून देखील सदनिकेचा ताबा विहीत वेळेत न देणार्‍या चिंतामणी कन्स्ट्रक्शनला अतिरिक्‍त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दणका दिला आहे. 
बिल्डरला भरपाई पोटी 20 हजार रूपये देण्याचे आदेश देताना सदनिकेसाठी दिलेली 7 लाख 35 हजार रूपये रक्‍कम 12 टक्के व्याजाने सहा आठवड्याच्या आत देण्याचा मंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे आणि एस. के. पाचारणे यांच्या मंचाने दिला आहे. बिल्डरने सहा आठवड्यात रक्‍कम परत न केल्यास रकमेवर 15 टक्के व्याज आकारण्याचे मंचाने निकालामध्ये सुचित केले आहे. 

सुनील धनराज केदार आणि स्वाती सुनील केदार (दोघेही रा. समर्थनगर, निगडी) या दाम्पत्याने अ‍ॅड. लक्ष्मण जाधव यांच्यामार्फत चितामणी कन्स्ट्रक्शन (पत्ता- चिंतामणी प्लाझा,सणसवाडी व्हीलेजसमोर, पुणे) चे महेश रामचंद्र तिखे (रा. गगन आशिष रेसिडेन्सी, वारजे माळवाडी) यांच्या विरोधात ग्राहक मंचात धाव घेतली होती. प्रतिवादी महेश तिखे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा सदनिका विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी चिंतामणी प्लाझा हा प्रकल्प जाहीर केला होता. त्यानुसार तक्रारदारांनी तिखे यांच्या या प्रकल्पामध्ये सदनिका बुक केली होती. सदनिकेची किंमत 11 लाख 75 हजार ठरल्यानंतर 18 जून 2014 रोजी ही सदनिका केदार दाम्पत्याने बुक केली. तक्रारदारांनी सदनिकेसाठी अद्यापपर्यंत 7 लाख 35 हजार रूपयेच दिले.

3 नोव्हेंबर 2015 रोजी सदनिका विक्रीचा नोंदणीकत करारनामा करण्यात आला. सदनिकेचा ताबा 12 महिन्यात देण्याचे ठरले असतानाही तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळाला नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही सदनिकेची उर्वरित रक्‍कम देण्यास तयार असतानाही तक्रारदारांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सुरूवातीला नोटीस पाठवून नंतर मंचात दावा दाखल करून सदनिकेच्या रकमेची मागणी केली. अ‍ॅड. लक्ष्मण जाधव यांनी तक्रारदारांना बिल्डरने कसे वेठीस धरले ही बाब स्पष्ठ केल्यानंतर मंचाने बाजूने निकाल दिला. 12 टक्के व्याजाने रक्‍कम परत करण्याबरोबरच 20 हजार रूपये नुकसान भरपाई, तक्रारीच्या खर्च, असे 3 हजार रूपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 

 

 

tags : pune news,Chintamani, Construction, Compensation,Order,


  •