Wed, Nov 14, 2018 00:28होमपेज › Pune › धुळवडीनिमित्त पुणेकरांचा चिकन, मासळीवर ताव

धुळवडीनिमित्त पुणेकरांचा चिकन, मासळीवर ताव

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी

धुळवडीच्या दिवशी तब्बल 20 टन मासळी व साडेसातशे टन चिकन फस्त करत पुणेकरांनी धुळवड साजरी केली. दरवर्षी, धुळवडीच्या दिवशी सामिष पदार्थ तयार करण्यात येतात. त्यामुळे मटण, चिकन आणि मासळीच्या बाजारात मोठी उलाढाल होत असते. त्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. यंदा मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने मासळीच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ झाली. तर मटण व चिकनचे दर कायम असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

याबाबत बोलताना गणेशपेठ मासळी बाजारातील विक्रेते ठाकूर परदेशी म्हणाले, मासळी बाजारात शुक्रवारी खोल समुद्रातील सात ते आठ टन, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला, सिलन या मासळीची मिळून दहा ते बारा टन, नदीतील मासळी सातशे ते आठशे किलो, खाडीतील मासळी 100 ते 200 किलो इतकी आवक झाली. मात्र, आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्यामुळे मासळीच्या भावात पाच टक्क्यांनी वाढ झाली. गणेशपेठ मासळी बाजारात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती.

उपनगरातील किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीला चांगली मागणी राहिली. किरकोळ ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.  पुणे जिल्हा परिसरातून मोठ्या पोल्ट्री व्यावसायिकांकडून कोंबड्या बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जातात. बाजारात जिवंत पक्ष्यांची आवक केली जाते. त्यांना लाईव्ह बर्डस् म्हणतात. साधारणपणे पुणे शहर परिसरात साडेसातशे टन चिकनची आवक बाजारात झाली आहे. धुळवडीच्या दिवशी चिकनच्या मागणीत चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. धुळवडीच्या दिवशी चिकनला घरगुती ग्राहकांकडून अधिक मागणी असते. चिकनचा प्रतिकिलोचा भाव 130 रुपये असा राहिला, असे व्यापारी रुपेश परदेशी यांनी सांगितले. 

दरम्यान, दहावीची परीक्षा, उन्हाचा कडाका आणि सलग सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांमुळे मटण बाजारात धुळवडीच्या तुलनेने खूपच कमी उलाढाल झाली. रविवारी असते त्याप्रमाणेच साधारण गिर्‍हाईक होते. बोकड आणि बोल्हाईच्या मटणाचा प्रतिकिलोचा भाव 460 रुपये असा राहिला असल्याची माहिती मटणविक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.