Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Pune › सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसंबंधी आयुक्तांनी काढला अध्यादेश

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसंबंधी आयुक्तांनी काढला अध्यादेश

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

शहरवाशियांना चोवीस तास व मुबलक पाणीपुरवठा मिळण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना पालिकेकडून राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी शहरातील रस्त्यांची खोदाई केली जाणार असल्याने 12 मिटरपेक्षा कमी रुंदी असणार्‍या रस्त्यांवर सिमेंट काँक्रे टचे नवीन रस्ते करण्यास मान्यता देऊन नये, अशी मागणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्थायी समितीकडे केली होती. ती स्थायीने मान्यही केली होती. मात्र शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे थांबली नव्हती. या रस्त्यांच्या कामावर नियंत्रण येण्यासाठी पालिका आयुक्तांनी अध्यादेश काढला आहे. 

समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गेल्या चार वर्षापासून चर्चा सुरू आहे. दरवर्षी या योजनेसाठी पुणेकरांच्या पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्यास तीन वर्षापूर्वीच सर्वसाधारण सभेत मंजुरीही दिली आहे. या योजनेअंतर्गत 1700 किलोमीटची पाइपलाइन टाकली जाणार आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले जाणार आहेत.

योजनेस मान्यता नसल्याने पालिकेच्या पथ विभागाने अनेक गल्लीबोळातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून टाकले आहेत. पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते फोडले जाणार असल्याची माहिती असतानही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. रस्ते खोदताना पाणीपुरवठा आणि पथ विभागातील अधिकार्‍यांनी एकमेकांना विश्वासात न घेता ही कामे केल्याने याचा भुर्दंड पुणेकरांना सहन करावा लागणार आहे. 

गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत समान पाणीपुरवठा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. पुढील काही दिवसात या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी मोठ्या हौसेने पथ विभागाने तयार केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते या योजनेसाठी खोदावे लागणार आहेत. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत नवीन रस्त्याच्या कामाला मंजूरी देऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाने आणि त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने केली होती.

मात्र कामे सुरूच होती या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते करताना यापुढील काळात पथ विभागाने पाणीपुरवठा विभाग तसेच मलनिस्सारण विभागाचा अभिप्राय घेऊनच कामाला सुरूवात करावी, असे अध्यादेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढला आहे. याबरोबरच 12 मीटर आणि त्यापेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यावर काँक्रीटची कामे करू नयेत, असेही आयुक्तांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे काँक्रीटीकरणाच्या कामावर होणारी उधळपट्टी थांबण्यास मदत  होणार आहे.