Wed, Apr 24, 2019 02:11होमपेज › Pune › बोंडअळी नुकसान; ९७१ कोटी भरपाई

बोंडअळी नुकसान; ९७१ कोटी भरपाई

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

कापूस वाण उत्पादन करणार्‍या 72 कंपन्यांना ऑगस्ट महिनाअखेर सुमारे 971 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी देण्याचा आदेश कृषी आयुक्तालयाने दिला असून, या निर्णयामुळे शेतकर्‍यांना किंचित दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांकडून आलेल्या तक्रारींवर सुनावणी झाल्यानंतर हे आदेश निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे यांनी दिल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली.

याबाबत ‘पुढारी’शी बोलताना अधिकार्‍यांनी सांगितले की, लातूर, जालना, वर्धा, चंद्रपूर, औरंगाबाद, जळगांव आणि नांदेड आदी जिल्ह्यातील सुमारे 9 लाख 26 हजार 861 शेतकर्‍यांकडून कापसावरील बोंडअळीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या. त्यानुसार बाधित क्षेत्राचा आकडा 3 लाख 57 हजार 648 हेक्टर इतका आहे. कापूस पिकाचे सरासरी 40 ते 70 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे आढळून आलेले आहे. याबाबत कापूस विक्री व्यवसाय करणार्‍या एकूण 72 कंपन्यांचा समावेश आहे. प्रति हेक्टरी सरासरी 27 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्‍चितीकरण यांचे विनियमन) अधिनियम,2010 मधील नियम 12 (7)(2) नुसार किड व रोग याकरिता रोग प्रतिकारशक्ती आवश्यक प्रमाणात नसल्याने शेतकर्‍यांचा पिक संरक्षण उपाय योजनांवर अतिरिक्त खर्च झाला आहे व पिकांचे नुकसान झाले आहे, असा अहवाल त्या त्या जिल्हा स्तरीय समित्यांनी पाठविलेला आहे. तसेच बियाणे कंपन्यांनी नमूद केलेल्या लेबल क्लेमनुसार किंवा माहिती पत्रकानुसार शेंदरी बोंडअळी या कीडीस प्रतिकार क्षमता आढळून आलेली नाही. त्यामुळे  संबंधित कंपन्यांनी आदेशापासून 30 दिवसांच्या आत रक्कम द्याावी. ही रक्कम वेळेत न दिल्यास 24 टक्के दराने त्यावर व्याज आकारणी करण्यात येईल आणि कोणतीही रक्कम प्रदान केलेली नसल्यास त्याबाबत नियंत्रक तथा निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण कृषी संचालक ठरवतील त्याप्रमाणे कंपनीवर शास्ती लादण्यात येईल, असेही याबाबतच्या आदेशांमध्ये नमूद केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.