होमपेज › Pune › तब्बल चारशे बोगस पीएच.डी.चे वाटप

तब्बल चारशे बोगस पीएच.डी.चे वाटप

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यात नियमबाह्य पदव्या देणार्‍या शैक्षणिक संस्था आणि बोगस विद्यापीठांचा सुळसुळाट झाला आहे. परंतु या शैक्षणिक संस्थावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकारची बोगस विद्यापीठे आणि संस्थांना फुटाफुटांवर पेव फुटलेले दिसून येत आहेत. पंरतु उच्च शिक्षण विभाग मात्र कारवाईच्या बाबतीत लालफितीत अडकल्यामुळे कोणतीही ठोस कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर हे बोगस विद्यापीठ असल्याचे उघड झाल्यानंतर अशाच प्रकारचे आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नावाचे विद्यापीठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सुभाषनगर परिसरात असल्याचे उघडकीस आले आहे.

या विद्यापीठाने तब्बल चारशे बोगस पीएच.डी. चे वाटप केल्याचे विभागीय सहसंचालकांनी रविवार दि.25 रोजी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सुभाषनगर परिसरात दहा बाय दहा च्या एका खोलीत आयनॉक्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या नावाने एक ऑनलाईन विद्यापीठ सुरू करून अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, विज्ञान, कला, विधि अशा विद्याशाखांमधील पीएच.डी. तसेच मानद  डी.लीटच्या पदव्या काही हजार रुपयांमध्ये देण्याचा प्रताप या विद्यापीठाने केला आहे. या विद्यापीठामार्फत आत्तापर्यंत तब्बल 400 लोकांना फिलॉसॉफी ऑफ डॉक्टरेट अर्थात पीएच.डी. तसेच डी.लीट या पदव्या उघडपणे वाटल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पुणे शहरातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये देखील या विद्यापीठाद्वारे देण्यात आलेल्या पीएच.डी. घेऊन काम करणारे अध्यापक असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. 

विद्यार्थ्यांना आयनॉक्स ही आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त ऑनलाईन युनिव्हर्सिटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी संकेतस्थळावर इंटरनॅशनल कमिशन फॉर हायर एज्युकेशन, इंटरनॅशनल अ‍ॅक्रेडिटेशन अ‍ॅन्ड रिकग्नीशन कौन्सिल, इंटरनॅशल ऑनलाईन युनिव्हर्सिटीज अ‍ॅक्रेडिटेशन कमिशन या संस्थांचे प्रमाणपत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. या विद्यापीठाला कोणत्याच प्रकारची राज्य आणि केंद्र सरकारची मान्यता नाही. तसेच, विद्यापीठाचे शैक्षणिक संकुलदेखील नाही.  विद्यापीठ मान्यातप्राप्त आहे, यासाठी पदवीप्रदान समारंभाचे छायाचित्रेदेखील संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. तर, विद्यापीठाने सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, मैदान आदींची खोटी माहिती टाकली आहे.

विद्यापीठाकडे 768 विद्याशाखा; तर 678 महाविद्यालये संलग्नित आहेत. त्याचप्रमाणे 800 प्रशिक्षित शिक्षक असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु या सर्वच गोष्टी खोट्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती कोल्हापूर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.अजय साळी यांनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते डॉ.अभिषेक हरीदास तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी यासंदर्भातील तक्रार केल्यानंतर डॉ.अजय साळी यांनी या विद्यापीठाची चौकशी करून हे विद्यापीठ बोगस असल्याचे जाहीर केले आहे. तसेच यासंदर्भातील अहवाल उच्च शिक्षण संचालनालयास सादर केला आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा तथाकथीत कुलपती डॉ.विठ्ठल मदणे याच्यावर आता लवकरच कारवाई होणार असल्याचे स्पष्ष्ट झाले आहे.
 

 

 

tags ; pune,news,Bogus,University, Graduation ,Action,


  •