Sun, Feb 17, 2019 22:09होमपेज › Pune › भिडे-एकबोटेंची नार्को टेस्ट करा

भिडे-एकबोटेंची नार्को टेस्ट करा

Published On: Jan 06 2018 1:43AM | Last Updated: Jan 06 2018 1:42AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा येथे जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवून आणण्यात काही जातीयवादी आणि धर्मांध प्रवृत्तीचा हात होता. दलित व मराठा असा कोणत्याही प्रकारचा वाद या प्रकरणात नाही. या दंगलीचे सूत्रधार समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांवर अटकेची कारवाई करून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी मराठा आणि दलित समाजातील काही नेत्यांनी शुक्रवारी (दि. 5) पत्रकार परिषदेत केली.

या घटनेनंतर मराठा आणि दलित समाजाच्या काही नेत्यांची पुण्यात शुक्रवारी बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही समाजाच्या नेत्यांनी ही माहिती दिली. आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याचे समन्वयक शांताराम कुंजीर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शेकापचे प्रवीण गायकवाड, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, कैलास पठारे आदी या वेळी उपस्थित होते. दलित आणि मराठा समाजात तेढ निर्माण करणार्‍यांच्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. दंगलीत बळी गेलेल्या राहुल फटांगळे या युवकाच्या कुटुंबीयांना शासनाने 25 लाख, तर दंगलीत जखमी झालेल्यांना 2 ते 5 लाखापर्यंत मदत द्यावी; तसेच नुकसानग्रस्त लोकांना नुकसानभरपाई द्यावी.

छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे 28 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी. कोरेगाव-भीमा विजयस्तंभ येथे 24 तास कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत, याबाबत समाजाकडून खबरदारी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.