Thu, Nov 15, 2018 12:26



होमपेज › Pune › भगवद्गीता, ज्ञानेश्‍वरी सोप्या भाषेत अभ्यासक्रमात 

भगवद्गीता, ज्ञानेश्‍वरी सोप्या भाषेत अभ्यासक्रमात 

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 1:26AM



पुणे :

संतसाहित्यातील विज्ञाननिष्ठा सगळ्यांसमोर आणणे आवश्यक आहे. संतसाहित्यातील जीवनमूल्ये आपल्या आचरणात उतरवणे, आजच्या काळाची गरज आहे. ही जीवनमूल्ये आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे कसे नेता येतील याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षणमंत्री म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमात भगवद्गिता आणि ज्ञानेश्‍वरी सोप्या भाषेत कशी आणता येईल, याचा सातत्याने विचार करत आलेलो आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या वेळी केले. 

संतसाहित्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दरवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शुक्रवारी अण्णा भाऊ साठे सभागृहात 2016-17 सालासाठीचा ह.भ.प डॉ. किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ विजय भटकर, महापौर मुक्ता टिळक, खा. अनिल शिरोळे, आ. योगेश टिळेकर, आ. भीमराव तापकीर, आ. माधुरी मिसाळ, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, रामकृष्ण महाराज लहवितकर आदी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह असे आहे.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. किसन महाराज साखरे म्हणाले, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराच्या निवड समितीत मी यापूर्वी काम केले आहे. आता हा पुरस्कार मला मिळत आहे. हा पुरस्कार आयुष्याला प्रोत्साहन देतो. तुकाराम महाराज ज्ञानेश्‍वर महाराज ही महाराष्ट्राची दैवत आहेत.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडिता मंजूषा पाटील आणि त्यांच्या टीमने अभंगरंग याअंतर्गत अवघे गरजे पंढरपूर, जय जय राम कृष्ण हरी, नामाचा गजर, आदी विविध अभंगांचे गायन केले. तसेच रघुनाथ खंडाळकर यांनी संताचा अनुभव, संतची जाणते, हा अभंग सादर केला. यावेळी बाल वारकर्‍यांनी साखरे महाराज यांचे 102 ग्रंथ डोक्यावर घेऊन वारी काढली.

पुरस्काराची रक्कम संस्कृत शाळेसाठी 

इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांप्रमाणे संस्कृतची कॉन्व्हेन्ट सुरू करावी, अशी मागणी या वेळी किसन महाराज साखरे यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली. त्यासाठी पुरस्काराची रक्कम पाच लाख आणि त्यामध्ये एक लाख जमा करून सहा लाख रुपये त्यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे सुपूर्द केली. याबाबत तावडे म्हणाले की, राज्याने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू केले असून, याच्या पहिल्या वर्गापासून संस्कृत विषय अनिवार्य करण्यात आला आहे. या वेळी विनोद तावडे व गिरीश बापट यांनीही आपले एका महिन्याचे वेतन शाळेसाठी देण्याची घोषणा केली.