Sat, Jan 19, 2019 13:42होमपेज › Pune › बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू होणार जमीनदोस्त

बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू होणार जमीनदोस्त

Published On: Feb 27 2018 5:47PM | Last Updated: Feb 27 2018 6:38PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील सांस्कृतिक जीवनाचा मुकूटमनी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू लवकरच जमीनदोस्त होणार आहे. ही वास्तू पाडून त्यावर बहुमजली थिएटर उभारण्यात येणार आहे. त्यात विविध आकारांच्या सुसज्ज थिएटर्ससह मुबलक पार्किंग आणि जागतिक पातळीवरील मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी सादर केले, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील नाट्यगृहासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास. पुण्यातील सांस्कृतिक पंढरी, कलाकारांचे माहेरघर अशा विविध बिरुध्दांनी ओळखल्या जाणार्‍या बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या अंदाजपत्रकात तब्बल १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सद्या अस्तित्वात असलेली बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून त्याठिकाणी नवीन बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे.  

त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारी विविध आकाराची सुसज्ज थिएटर्स, मुबलक पार्किग, मनोरंजनाच्या विविध सुविधा करून बालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहोळ यांनी दिली.  

सुवर्ण मोहत्सवी इमारत
बालंगर्धव रंगदिराची वास्तू ही पन्नास वर्षांहून अधिक जुनी आहे. बालगंधर्व रंगमंदिराने नुकताच सुर्वणमहोत्सव साजरा  केला आहे. याठिकाणी सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे आयोजन सुरू होते. गेल्या काही वर्षांत राजकीय कार्यक्रमांची संख्याही त्यात वाढली होती, त्यामुळे या रंगमंदिराच्या तारखा मिळणे अवघड होऊन बसले आहे.  

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुर्नविकासामुळे नवीन बालगंधर्व हे पुण्याचेच नव्हे तर देशातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र होऊ शकणार आहे.

मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष.