Tue, Nov 20, 2018 13:15होमपेज › Pune › पुणेकरांना घडणार खगोल विश्वाची सफर 

पुणेकरांना घडणार खगोल विश्वाची सफर 

Published On: Feb 11 2018 1:35AM | Last Updated: Feb 11 2018 12:16AMपुणे : प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतूहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसार्‍यातील काही उदबोधक तथ्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्यावतीने सहकारनगर येथील स्व. राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलमध्ये अत्याधुनिक थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित तारांगण साकारण्यात आले आहे. या तारांगणामुळे पुणेकरांना आता खगोल विश्वाची सफर घडणार आहे. या तारांगणाचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. साकारण्यात आलेल्या तारांगणाच्या डोम व्यास सुमारे 9. 50 मीटर असून तो ’एफ. आर. पी.’ मध्ये तयार करण्यात आला असून 15 अंशात पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोल विश्वात असल्याची अनुभूती मिळते.

अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक 4 के रेझ्यूलेशनचे 3 व्हिज्युलायझेशन डिजीटल तंत्रज्ञानाचा आणि 10.1 क्षमतेच्या ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. यासाठी चष्म्याविरहित 3 डी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तारांगणाची आसन क्षमता 52 खुर्च्यांची आहे. हायडेफिनेशनचे आठ प्रोजेक्टर उच्चक्षमतेची आधुनिक ध्वनी यंत्रणा आहे.

या तारांगणाच्या निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे. साधारण 20 ते 25 मिनिटांच्या कालावधीची फिल्म शो पाहता येणार आहे. उद्घाटनानंतर एक महिना हे तारांगण नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या तारांगणास ‘दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख थ्री डीव्हिज्युलायझेशन डिजिटल तारांगण’ असे नाव दिले जाणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या पत्रकार परिषदेस माजी आमदार उल्हास पवार, पालिकेचे अधिकारी रामदास तारु आणि महेंद्र शिंदे उपस्थित होते.