Wed, Mar 27, 2019 00:36होमपेज › Pune › प्लॅस्टिकविरोधी कारवाई तीव्र होणार

प्लॅस्टिकविरोधी कारवाई तीव्र होणार

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाने राज्यात प्लॅस्टीक बंदी केल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दिलेला कालावधी 23 जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यानंतर प्लॅस्टीकविरोधी कारवाई तीव्र केली जाणार आहे. जे नागरिक प्लॅस्टिकचा वापर करताना दिसतील, त्यांच्यावर 5 हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सह महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली आहे. दरम्यान, जानेवारी ते मे या पाच महिन्यात घनकरता विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या कारवाई पथकाने 3 हजार 175 कारवाया करून 7 हजार 416 टन स्लास्टिक जप्त करून 12 लाख 94 हजार 490 रुपये दंड वसुल केल्याचेही जगताप यांनी सांगितले.  

    राज्य शासनाने संपूर्ण प्लॅस्टीक बंदीची घोषणा केल्यानंतर 18 मार्चपासून अध्यादेशाद्वारे राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केली. त्यापूर्वी महापालिकेकडून शहरात 50 मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीकवर कारवाई केली जात होती. राज्य शासनाने बंदी जाहीर केलेल्या तारखेपासून पुढील तीन महिने प्लॅस्टीक न वापरण्यासंबंधी लोकांमध्ये जनजागृती केली जाईल, त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते. जनजागृतीसाठी देण्यात आलेली मुदत 23 जून रोजी संपणार आहे. ही मुदत पंधरा दिवसाने वाढविण्याचा विचार राज्य शासन करत आहे, मात्र दोन दिवसात याबाबतचे पत्र न मिळाल्यास प्लॅस्टिकविरोधी कारवाई तीव्र केली जाणार आहे. यामध्ये प्लॅस्टीक उत्पादक, विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सामान्य नागरिक जरी स्लॅस्टिकचा वापर करताना, आढळले तर त्यांनाही 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सह पालिका आयुक्त जगताप यांनी सांगितले आहे.