Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Pune › ज्येष्ठाला 50 लाखांचा गंडा

ज्येष्ठाला 50 लाखांचा गंडा

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:23AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

चांगल्या परताव्याची हमी देत ज्येष्ठाला फायनान्समध्ये पैसे गुंतविण्यास लावून दोन जणांनी तब्बल पन्नास लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महाडिक (64, कात्रज) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून किशोर मारुतीराव टमके (बालाजीनगर) व अप्पासाहेब शिवाजी पाटील (मांजरी बु.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महाडिक हे 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधून सबस्टाफ पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा व सून हे दोघे उच्चपदावर काम करतात. तर त्यांची मुलगी अमेरिकेत राहण्यास आहे. दरम्यान बालाजीनगर येथे त्यांचे मित्र रामभाऊ जाधव राहतात. टमके हा त्यांचा जावई आहे. त्यांचे कौैटुंबीक संबंध आहेत. टमके याचा भारती विद्यापीठासमोर महालक्ष्मी फॅब्रिकेशन नावाचा व्यवसाय  आहे. दरम्यान 2014 मध्ये किशोर टमकेने अप्पासाहेब पाटील याच्याशी ओळख करून दिली. ते दोघे भाग्य लक्ष्मी फायनान्स नावाने फायनान्सचा व्यवसाय करत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या व्यवसायात चांगली वसूली होत असल्याचे महाडिक यांच्या मनावर बिंबवले.

तसेच महाडिक यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतर खूप पैसे येणार आहेत हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आलेले पैसे बँकेत गुंतविण्यापेक्षा दोघांच्या व्यवसायात गुंतविल्यास जास्त परतावा मिळेल असे अमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी महाडिक यांच्याकडून 2014 अखेरपर्यंत तब्बल 75 लाख रुपये घेतले. या रकमेच्या वेळोवेळी पोचपावत्या मागितल्या; मात्र त्या त्यांनी दिल्या नाहीत. महाडिक यांनी याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना काहीच सांगितले नव्हते. मात्र कुटुंबियांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी खरा प्रकार सांगितला. त्यानंतर 2015-16 पर्यंत त्यांनी व्यवसाय चांगला चालल्याचे समजून पैसे मागितले नाहीत. मात्र कुटुंबीयांनी टमके व पाटील यांना विचारणा केल्यावर त्यांचा व्यवसाय तोट्यात चालल्याचे सांगून महाडिक यांनी दिलेल्या पैश्यांपैकी केवळ मुद्दल 75 लाखच परत देणार असे सांगितले. त्यानंतर त्यातील पंचवीस लाखांच्या मोबदल्यात सोलापूर रोडवर असलेल्या सात एकर जमिनीचे खरेदी खत करून दिले. उर्वरित पन्नास लाख दोघे वाटून देणार आहेत. असे सांगून मुद्रांकावर लिहून दिले आणि त्या रकमांचे धनादेशही दिले. मात्र ते वटलेच नाहीत. त्यानंतर महाडिक यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.