Thu, Jul 18, 2019 04:16होमपेज › Pune › मराठा आरक्षणाबाबत प्रशासन सकारात्‍मक : जिल्‍हाधिकारी 

मराठा आरक्षणाबाबत प्रशासन सकारात्‍मक : जिल्‍हाधिकारी 

Published On: Aug 07 2018 6:17PM | Last Updated: Aug 07 2018 6:17PMपुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्‍याच्‍या मागणीबाबत प्रशासन सकारात्‍मक असून आपणही आंदोलन शांततेने करावे, खाजगी किंवा शासकीय मालमत्‍तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी केले.

मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने 9 ऑगस्‍ट रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख, राजेंद्र कोंढरे, बाळासाहेब अमराळे, राहूल पोकळे, विराज तावरे, रघुनाथ चित्रे, तुषार काकडे, युवराज दिसले, हर्षल लोहकरे आदींसह महिला उपस्थित होत्‍या.

नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी संबंधितांच्‍या भावना जाणून घेतल्‍या. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्‍हे, आण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या कर्जयोजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्‍यवृत्‍ती योजना, आदींबाबत आपापली मते मांडली.  9 ऑगस्‍ट रोजीचे आंदोलन शांततापूर्ण असेल तसेच रास्‍ता रोको करण्‍याचे कोणत्‍याही प्रकारचे नियोजन नसल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्वांच्‍या भावना समजावून घेतल्‍या. मराठा आरक्षण प्रश्‍नी आत्‍महत्‍या करण्‍याचे प्रकार दुर्दैवी आहे. मृत्‍यूमुळे होणारे नुकसान कोणीही भरुन काढू शकत नाही, त्‍यामुळे विद्यार्थी तसेच तरुणांना असे चुकीचे पाऊल न उचलण्‍याबाबत समाजातील व्‍यक्‍तींनी आवाहन करावे. .  याशिवाय मराठा समाजाच्‍या आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत 72 हजार जागांच्‍या मेगा भरतीलाही स्‍थगिती देण्‍यात येईल, असे  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले असल्याचे  जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी लक्षात आणून दिले.  

जिल्‍हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनीही कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहणे, ही आपणां सर्वांसाठी आवश्‍यक बाब असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने यापूर्वी काढलेले 58 मोर्चे हे शांततेच्‍या मार्गाने आणि शिस्‍तबध्‍द होते, याचे संपूर्ण जगात कौतुक झाले.  तथापि, काही अनुचित प्रकारांमुळे या शिस्‍तीला गालबोट लागल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.