Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Pune › पुरंदर विद्यापीठावर कारवाई नाहीच

पुरंदर विद्यापीठावर कारवाई नाहीच

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी 

बोगस पुरंदर विद्यापीठावरील कारवाईसंदर्भात काहीही हालचाल न झाल्याने, राज्याचे उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांकडे यासंदर्भात विचारणा केली आहे. वायकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी विद्यापीठात आले होते. या वेळी राज्यमंत्र्यांना बोगस पुरंदर विद्यापीठ, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नियमबाह्य चित्रपट सेट प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. यावर सात दिवसांमध्ये या दोन्ही प्रकरणांचा निकाल लावण्याचे आदेश त्यांनी दिले होते, परंतु निर्ढावलेल्या उच्च शिक्षण विभाग, तसेच विद्यापीठ प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.

यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘पुढारी’ने दिल्यानंतर राज्यमंत्री वायकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांना पुरंदर विद्यापीठावरील कारवाईबाबत विचारणा केली आहे.
राज्यात नियमबाह्य पदव्या विविध नामांकित विद्यापीठाकडून देण्यात येत असतानाच, चक्क विद्यापीठच बोगस पध्दतीने काढून नियमबाह्य पदव्यांची खैरात करणार्‍या बोगस पुरंदर विद्यापीठावर सात दिवसांमध्ये कारवाईचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिल्यानंतर देखील जवळपास महिना होत आला तरी कारवाई झालेली नाही. चित्रपटाच्या सेटवर कारवाई करण्यास विद्यापीठ प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांबाबत नेमकी कारवाई कधी होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पुरंदर या बोगस विद्यापीठावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले असल्याचे सांगितले. तर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांना  मंगळवार दि.27 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नियमबाह्य चित्रपट सेटवर कारवाई करण्याचे आदेश फोनवरून दिले आहेत, परंतु निर्ढावलेले विद्यापीठ प्रशासन उच्च शिक्षण विभागाच्या आदेशाकडे नेहमीच दुर्लक्ष करत असते. त्यामुळे आता तरी विद्यापीठ प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्‍न उपस्थित  झाला आहे.