होमपेज › Pune › चोरांचा ‘राजा’ जाळ्यात; ५२ घरफोड्या उघडकीस

चोरांचा ‘राजा’ जाळ्यात; ५२ घरफोड्या उघडकीस

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:12AM

बुकमार्क करा

 पुणे : प्रतिनिधी

भरदिवसा घरफोड्यांनी हादरवून सोडणारा आणि पोलिसांसमोर आव्हान उभे करणारा घरफोड्यांमधील ‘चोरराजा’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक करत तब्बल 52 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत 161 तोळे दागिन्यांसह 46 लाख 58 हजार 740 रुपयांचा माल जप्त केला. विशेष म्हणजे, या सर्व घरफोड्या त्याने भरदिवसा केल्या आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला व सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजेश राम पपूल ऊर्फ चोरराजा (वय 31, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) व त्याचा साथीदार गणेश मारुती काटेवाडे (वय 30, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये घरफोड्या करत चोरट्यांनी हैदोस घातला होता. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या चोरट्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना जेरबंद करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे कर्मचारी यशवंत खंदारे व पोलिस हवालदार अनिल उसुलकर यांना राजेश पपूल ऊर्फ ‘चोरराजा’ व त्याचा साथीदार हे कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्यांनी 52 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून या गुन्ह्यांमधील 161 तोळे सोन्याचे 45 लाख 8 हजार रुपये किमतीचे  दागिने आणि इतर साहित्य असा एकूण 46 लाख 58 हजार 740  रुपयांचा माल जप्त केला. 

राजेश पपूल ऊर्फ ‘चोरराजा’ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 12 गुन्हे दाखल आहेत. तो फेब्रुवारी 2016 ला कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर घरफोड्या करण्यास सुरुवात केली. दरम्यान शहरात गेल्या वर्षी (2016) पेक्षा यंदा घरफोड्यांचे गुन्हे कमी झालेले आहेत. 2016 मध्ये 1 हजार 44 घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील 498 गुन्हे उघडकीस आले होते; तर यंदा नोव्हेंबरपर्यंत 911 घरफोड्यांचे गुन्हे घडले आहेत. त्यात भरदिवसा 206 आणि रात्री 695 घरफोड्या झाल्या आहेत. त्यातील 562 गुन्हे उघडकीस आले आहेत.  ही कारवाई पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक इजाज शिलेदार, अनिल उसुलकर, अमोल भोसले, यशवंत खंदारे, दिनकर भुंजबळ, सुभाष कुंभार, दत्ता गरुड, संजय जगताप, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, अनिल शिंदे, निजाम तांबोळी, संजय ढोले यांच्या पथकाने केली.