होमपेज › Pune › राज्यात 41 साखर कारखान्यांची धुराडी बंद

राज्यात 41 साखर कारखान्यांची धुराडी बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  : प्रतिनिधी

राज्यातील ऊस गाळप हंगाम अखेरीस आता सुरुवात झाली असून, 187 पैकी 41 साखर कारखान्यांची धुराडी ऊस संपल्याने बंद झालेली आहेत, तर 872 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 97 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातून देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील 13 आणि सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झालेला आहे. मंत्री समितीच्या बैठकीनुसार, राज्यात सुमारे 649 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन राज्यात साखरेचे 73.50 लाख टन साखर उत्पादन तयार होण्याची हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षा होती. मात्र, परतीच्या पावसामुळे ऊस उत्पादकतेत वाढ होऊन प्रतिहेक्टरी सरासरी ऊस उत्पादकता 80 वरून 95 ते 98 टनांपर्यंत वाढली. काही ठिकाणी 105 ते 110 टनांपर्यंत उत्पादकता हाती आलेली आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक ऊस उपलब्धता झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झालेले आहे. 

विभागनिहाय स्थिती पाहता ऊस संपल्याने कोल्हापूर विभागात 15, पुणे 8, अहमदनगर 1, औरंगाबाद 5, नांदेड 7, अमरावती 1, नागपूर 4 मिळून 41 साखर कारखाने बंद झालेले आहेत. ऊस पट्ट्यातील प्रमुख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 22 पैकी 13 कारखान्यांचा हंगाम बंद झालेला आहे. तर सांगली जिल्ह्यातील 18 पैकी दोन कारखाने बंद झाले आहेत. सातारा जिल्ह्यात 15 पैकी एक, तर सोलापूर जिल्ह्यात 30 पैकी सात कारखाने बंद झालेले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्व म्हणजे 17 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

गतवर्षी म्हणजे हंगाम 2016-17 मध्ये याच कालावधीत 150 पैकी 148 साखर कारखाने बंद पडले होते. तर 371 लाख टन ऊस गाळप पूर्ण होऊन 41.75 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले होते. याचा विचार करता गतवर्षीपेक्षा चालूवर्षी गाळप आणि उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अनपेक्षितरीत्या उत्पादन विक्रमी येण्याची शक्यता वाढलेली आहे.
 

 

 

tags : pune,news, 41 sugar, factories,state ,Close,


  •