Mon, Apr 22, 2019 23:40होमपेज › Pune › राज्यात सरासरीच्या ४ टक्के अधिक पाऊस

राज्यात सरासरीच्या ४ टक्के अधिक पाऊस

Published On: Aug 20 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 1:22AMपुणे : प्रतिनिधी

नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून)  संपूर्ण राज्यात सरासरीच्या चार टक्के अधिक बरसला आहे. मध्य महाराष्ट्रात समाधानकारक म्हणजे सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात सरासरीच्या सात टक्के अधिक, तर विदर्भात सरासरीएवढ्या पावसाची नोंद करण्यात आली.

सध्या सुरू असलेल्या दमदार पावसानेे मराठवाड्यातील पाऊसमानही सुधारले आहे. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे 7 व 13 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात पंधरवड्यापूर्वी 15 टक्के असणारी तूट आता अवघ्या तीन टक्क्यांवर आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही तूट देखील भरून निघेल, अशी चिन्हे दिसत आहेत. 4-5 दिवसांपासून संततधार पावसाने सोयाबीनसह अनेक पिकांना जीवदान मिळाले आहे. धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

मध्य महाराष्ट्रात जुलैअखेर व ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यापासून आतापर्यंत दमदार पाऊस झाला.  पुणे 31 टक्के, सातारा 18 टक्के, कोल्हापूर दोन टक्के, नाशिक 20 टक्के व नगर जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आठ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.