Wed, Jun 26, 2019 12:11होमपेज › Pune › कोथरूडमधील शिवसृष्टीसाठी 25 कोटींची तरतूद

कोथरूडमधील शिवसृष्टीसाठी 25 कोटींची तरतूद

Published On: Feb 27 2018 4:30PM | Last Updated: Feb 27 2018 4:30PMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड येथील बीडीपीच्या जागेत साकारण्यात येणार्‍या शिवसृष्टीसाठी महापालिका आयुक्तांच्या अंदाज पत्रकात कोणत्याही प्रकरच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती, मात्र स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात शिवसृष्टीसाठी 25 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी साकारण्याचे नियोजन गेली दहा वर्षापासून आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात (डीपी) आरक्षण टाकण्यात आले आहे. याच जागेवर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचा डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे. या जागेवर भूमिगत मेट्रो डेपो आणि वरील भागात शिवसृष्टी साकारण्याचे आश्‍वासन सत्ताधार्‍यांनी दिले होते.

मात्र मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये कचरा डेपोची जागा मेट्रो स्टेशनला आणि चांदणी चौकाजवळील बीडीपीच्या 50 एकर जागेमध्ये शिवसृष्टी साकारण्यास मंजुरी देण्यात आली. ज्या दिवसी बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी साकारण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, त्याच दिवसी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांच्याही शिवसृष्टीला शासनाने मंजुरी देऊन आर्थिक तरतूदही केली. एकाच दिवसी दोन शिवसृष्टींना मंजुरी दिल्याने भाजपच्या धोरणावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यातच आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात कोथरूड येथील शिवसृष्टीस एक रूपयाची तरतूद केली नाही. त्यामुळे कोथरूड येथील शिवसृष्टीसंदर्भात प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड येथील शिवसृष्टीस 25 कोटी रूपयांची तरतूद केल्याने शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे.