Wed, Apr 24, 2019 12:05होमपेज › Pune › जिल्ह्यात आधार नोंदणीची 187 केंद्रे सुरू

जिल्ह्यात आधार नोंदणीची 187 केंद्रे सुरू

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसांपासून आधार नोंदणी यंत्रणेत बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. एक महिन्यात दोन वेळा संपूर्ण आधार नोंदणी यंत्रणेत बिघाड होऊन संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली होती. सोमवारी पुन्हा टप्प्याटप्प्याने शहर आणि जिल्ह्यात 187 केंद्रे सुरू झाली आहेत, अशी माहिती आधारचे नोडल अधिकारी तथा तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.  बँक खाते, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आदीसाठी आधार लिंक करण्याची 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आधार नोंदणी यंत्रणेत सातत्याने तांत्रिक बिघाड होत आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात देशभरातील आधार नोंदणी यंत्रणा कोलमडली होती. त्यात दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन नोंदणी ठप्प झाली होती. सोमवारी पुणे शहरात 108, हवेली तालुक्यात 16, तर जिल्ह्यात 63 आधार केंद्रे सुरू झाली आहेत.

आधार नोंदणी करण्याचे काम जवळपास 92 टक्के झाले असून, त्यात झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच देशातील आधारच्या मुख्य सर्व्हरमधील ‘सिक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल’मध्ये (एसएफटीपी) तांत्रिक बिघाड झाले होते. आधार नोंदणी केंद्रातील यंत्रावर नोंदणी झाल्यावर त्यामधील डेटा आधारच्या मुख्य सर्व्हरला पाठविला जातो. सिक्युअर्ड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने आधार यंत्रामधील डेटा  मुख्य सर्व्हरमध्ये पाठविला जाण्यात अडचणी येत होत्या. जर पाच दिवसांत यंत्रामधील डेटा सर्व्हरमध्ये अपलोड झाला नाही तर आपोआप मशिन बंद पडतात. ही समस्या राज्यात सर्वत्र जाणवत होती.