होमपेज › Pune › दरवर्षी10 लाख अनधिकृत फ्‍लेक्‍स

दरवर्षी10 लाख अनधिकृत फ्‍लेक्‍स

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 12:53AMपुणे : पांडुरंग सांडभोर

शहराला बकाल करणार्‍या अनधिकृत फ्लेक्सची संख्या तब्बल 10 इतकी आहे. दरवर्षी महापालिकेकडून एवढ्या मोठ्या संख्येने कारवाई करू एवढे फ्लेक्स हटविले जातात. मात्र, असे अनधिकृत फ्लेक्स लावणार्‍यांवर गेल्या काही वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या केवळ 20 इतकी आहे.

 जाहिरात फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिकेकडे आकाशचिन्ह परवाना हा स्वतंत्र विभागही आहे. जाहिरातींच्या परवानगीसाठी प्रशासनाने स्वतंत्र धोरणही तयार केले आहे. मात्र, या नुसार केवळ होर्डिग्जसाठीच परवानगी घेतली जाते. याव्यतिरिक्त रस्ते चौकांमध्ये, पथदिव्यांच्या खांबावर, इमारतींंच्या भितींवर असे वाट्टेल तेथे बिनदिक्कतपणे परवानगी न घेता फ्लेक्स लावले जातात. या अनधिकृत फ्लेक्सची आकडेवारी मोठी आहे. 

आकाश चिन्ह विभागाच्या माहितीनुसार पालिकेकडून दरवर्षी कारवाई करुन जवळपास 10 लाख अनधिकृत फ्लेक्स काढले जातात. मात्र, असे फ्लेक्स लावणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे धक्कादायक वास्तवही आहे. प्रामुख्याने जाहिरातींच्या फ्लेक्समध्ये राजकीय फ्लेक्सची संख्या अधिक आहे. त्यात नेते मंडळींना शुभेच्छा दिल्या जातात. त्यामुळे शुभेच्छा देणार्‍यांवर आणि ज्याला दिल्या आहेत, या दाघांवर कारवाई करता येत नसल्याची अडचण प्रशासनाकडून सांगण्यात येते. शुभेच्छा देणार्‍यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली तर उद्या खोटे जाहिरात फलक लावून शुभेच्छा देण्याचे प्रकार सुरू होतील. त्यामुळे कारवाईत मोठा अडसर येत आहे. परिणामी महापालिकेकडून कारवाईच होत नसल्याचे सांगण्यात आले. 

गेल्या काही वर्षात केवळ 20 गुन्हे दाखल झाले आहेत. एकीकडे अनधिकृत जाहीरात फलकांची संख्या लाखांमध्ये असताना त्यावरील गुन्ह्यांची संख्या दोन आकड्यांमध्ये आहे. त्यामुळे अशा अनधिकृत फ्लेक्सला जरब तरी कशी बसणार, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.