Sat, Jul 20, 2019 08:39होमपेज › Pune › राज्यात १ मार्चला ‘रोटी डे’

राज्यात १ मार्चला ‘रोटी डे’

Published On: Feb 28 2018 5:49PM | Last Updated: Feb 28 2018 5:49PMपुणे : प्रतिनिधी

अन्नदानाच्या प्रक्रियेला व्यापक स्वरूप देणारा ‘रोटी डे’ हा उपक्रम गुरूवार दि. 1 मार्च रोजी संपूर्ण राज्यभर साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने हजारो गरजूंना,उपेक्षितांना एक वेळचे भोजन उपलब्ध होईल. वर्षभर वेगवेगळे ‘डे’ साजरे करून आनंदाची अनुभूती घेणार्‍यांना अभिनेता अमित कल्याणकर आणि त्यांच्या मित्र परिवारांनी ‘रोटी डे’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

प्रेमाचा दिवस, मैत्रीचा दिवस, साडीचा दिवस, गुलाबांचा दिवस असे नानाविध दिवस समाजात साजरे होत असतात. यामध्ये, तरूण वर्ग उत्साहाने सहभागी होत असतो. हे दिवस साजरा करणार्‍या तरुणाईबरोबरच समाजातील सर्व नागरिकांनी सामाजिक भान बाळगून एक दिवस दुसर्‍याला अन्न द्यावे अशी ‘रोटी डे’मागील कल्पना आहे. पुण्यातील अभिनेता अमित कल्याणकर या युवकाला सुचलेली ही कल्पना गेल्या काही वर्षापासून व्यापक रूप घेत आहे. त्याने, व्हॉट्सअ‍ॅपसह सोशल मीडियाचा आधार घेत या उपक्रमाची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेला मोठया प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यातूनच 1 मार्च हा ‘रोटी डे’ म्हणून करण्याच्या कल्पनेची आखणी झाली.

आपल्या जवळच्या अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन तेथे पोळी-भाजी देता येईल किंवा अन्यत्र दिसणार्‍या गरजूंनाही पोळी-भाजी देता येईल, असेही आवाहन करण्यात आले आहे. ‘रोटी डे’च्या निमित्ताने राज्यातील विविध शहरात गरजूंना अन्नदान केले जाणार आहे. या उपक्रमामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे शिवाजीनगर मधील संस्थेला धान्यदान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे रस्त्यावरील भटक्या नागरिकांना अन्नदान, अभिनेता अमित कल्याणकर यांच्यातर्फे माउली सेवा सुश्रुषा केंद्रात धान्यदान, कलावंत विनोद खेडकर यांच्यातर्फे निवारा वृद्धाश्रमात धान्यदान, सिद्धेश्‍वर झाडमुखे यांच्यातर्फे विश्रांतवाडीतील मेंटल कॉर्नर मनोरुग्णालयात अन्नदान करण्यात येणार आहे.