Fri, Aug 23, 2019 21:58होमपेज › Pune › 'जिओ इन्स्टिट्यूट' शोधणार्‍याला ११ लाख पैसे बक्षिस..

'जिओ इन्स्टिट्यूट' शोधणार्‍याला ११ लाख पैसे बक्षिस..

Published On: Jul 11 2018 6:02PM | Last Updated: Jul 11 2018 6:02PMपुणे : प्रतिनिधी 

रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित 'जिओ इन्स्टिट्यूट' ला इन्स्टिट्यूट जन्मायच्या अगोदरच केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने ‘इन्स्टिट्युशन्स ऑफ़ एमिनन्स’ (आयओई)चा दर्जा दिल्याने सरकारवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यातच पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जिओ इन्स्टिट्यूट शोधणार्‍याला  ११ लाख पैसे ( ११ हजार रुपये ) बक्षिस जाहीर करत सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातील तीन खाजगी आणि तीन सरकारी संस्थाची ‘इन्स्टिट्युशन्स ऑफ़ एमिनन्स’ (आयओई) म्हणून निवड केल्याचे जाहीर केले. यामध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रस्तावित असलेल्या मात्र अद्याप अस्थित्वात नसलेल्या जिओ इन्स्टिट्यूटचा समावेश गुणवत्तासंपन्न संस्थामध्ये केला आहे. या प्रकरणामध्ये मोदी सरकारने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित दिले असून सरकारच्या या निर्णयावरुन चौफेर टिका करण्यात येत आहे. पुणे शहर मनविसेद्वारे शहरात पोस्टर लावून सरकारची खिल्ली उडवली आहे. जिओ इन्स्टिट्यूट हरवले असून ते सापडल्यास कळवा आणि ११ लाख पैसे (११ हजार रुपये ) मिळवा, असं उपरोधिक आवाहन केले आहे. 

जिओ इन्स्टिट्यूटला ‘इन्स्टिट्युशन्स ऑफ़ एमिनन्स शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्याच्या निर्णायावर ट्विटर आणि सोशल मीडियावरही चौफेर टिकेची झोड उठवली जात आहे.  जीओ इन्स्टिट्यूट  न सापडल्यास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.