होमपेज › Pune › राज्यात आढळले 6 हजार स्वाइन फ्लूचे रुग्ण

राज्यात आढळले 6 हजार स्वाइन फ्लूचे रुग्ण

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:50PM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

स्वाईन फ्लूने गेल्या वर्षी हाहाःकार माजवत राज्यात तब्बल 770 जणांचा बळी घेतला असून एकूण सहा हजार 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे विभागात आढळले आहेत. विशेष म्हणजे 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये रुग्णसंख्येत आणि मृत्यूंमध्ये शेकडो पटींनी वाढ झाली आहे. राज्याच्या साथरोग विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये राज्यात केवळ 86 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर, यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2017 मध्ये सहा हजार 100 वर पोहचली असून 770 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे याचा उद्रेक प्रचंड प्रमाणात झाला होता.

राज्यात आढळलेल्या सहा हजार 100 पैकी सर्वाधिक पाच हजार 456 रुग्ण हे पुणे विभागात आढळून आले आहेत. पुण्यासह, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि महापालिका मिळून हे रुग्ण आढळले होते. तसेच मुंबई आणि नाशिकसारख्या महानगरांमध्ये स्वाईन-फ्लूने अचानक डोकेवर काढल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण पहावयास मिळाले. एकट्या मुंबईमध्ये 32 जणाचा बळी गेला आहे.  वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आतापर्यंतच्या स्वाईन-फ्लूच्या अभ्यासानुसार हा ट्रेंड दर एक वर्षाआड पाहायला मिळतो. हा सीझनल ट्रेंड असून एकदा का हा विषाणू ठराविक भागातील वातावरणात पसरला तर, तेथील जनतेची त्यानुसार प्रतिकारक शक्ती तयार होते. पण, रोगाला प्रतिकार करण्याची ही शक्ती फक्त नऊ-दहा महिनेच राहते. म्हणून एक वर्षाआड हा आजार डोके वर काढतो, अशी माहिती साथरोग विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.