Fri, Jul 19, 2019 07:16होमपेज › Pune › शेतकर्‍यांच्या खात्यावर ३१२ कोटी जमा

शेतकर्‍यांच्या खात्यावर ३१२ कोटी जमा

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 2:03AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी
राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीची पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना रक्कम प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 99 हजार 800 सभासद शेतकर्‍यांच्या 311 कोटी 73 लाख रुपयांचा समावेश आहे. त्यामध्ये थकीत कर्जदारांसह नियमित कर्जफेड करणार्‍या आणि कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकर्‍यांचा समावेश असल्याची माहिती पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) आनंद कटके यांनी दिली. 

कर्जमाफीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेल्या 38 हजार 915  थकबाकीदार शेतकर्‍यांना  207 कोटी 47 लाख 78 हजार 320 रुपये आणि नियमित आणि वेळेवर कर्ज परतफेड करणार्‍या 60 हजार 885 शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभासाठीची  104 कोटी 25 लाख 96 हजार 115 इतकी रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे; तसेच याव्यतिरिक्त कर्जाचे पुनर्गठन केलेल्या 1 हजार 31 शेतकरी सभासदांनाही 4 कोटी 21 लाख रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील कर्जदारांच्या कर्जमाफीची माहिती उपलब्ध झाली असून, राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांच्या कर्जदार शेतकर्‍यांची माहिती प्राप्त करून घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कर्जमाफी योजनेत दौंड तालुक्यातील सर्वाधिक 8 हजार 544 शेतकर्‍यांना  50 कोटी 5 लाख 70 हजार 470 रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये कर्जमुक्ती लाभार्थ्यांची संख्या वेल्हा तालुक्यात 710, मुळशी तालुक्यात 781, आणि जुन्नर तालुक्यात 925 इतकी सर्वात कमी आहे. तर, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या प्रोत्साहनपर लाभ योजनेत खेड तालुक्यातील 12 हजार 407 शेतकर्‍यांना 17 कोटी 69 लाख 38 हजार 656 रुपयांचा लाभ मिळाला आहे. त्यामध्ये वेल्हा तालुक्यातील केवळ 770 शेतकर्‍यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळालेला आहे.