होमपेज › Pune › आता उद्योजकांचा २ टक्के नफा खेळांसाठी

आता उद्योजकांचा २ टक्के नफा खेळांसाठी

Published On: Dec 16 2017 2:21AM | Last Updated: Dec 16 2017 1:20AM

बुकमार्क करा

पुणे ः सुनील जगताप 

केंद्र शासनाने उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निश्‍चित करण्याच्या हेतूने क्रीडा क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये उद्योजकांच्या नफ्यातील 2 टक्के वाटा हा सीएसआर धोरणासाठी राखून ठेवण्यात येणार असून त्यामध्ये क्रीडा विभागाचाही समावेश करण्यात आलेला आहे. या धोरणामुळे क्रीडा क्षेत्राला, खेळाडूंना, तसेच सोयी-सुविधांना चालना मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शासनाच्या या उत्तरदायित्व धोरणानुसार 500 कोटींपेक्षा जास्त निव्वळ मूल्य असणार्‍या, 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणार्‍या किंवा पाच कोटींपेक्षा जास्त नफा असणार्‍या कंपन्यांनी त्यांच्या नफ्याच्या 2 टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणणे बंधनकारक असणार आहे. या धोरणामध्ये विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये युवा पिढीवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दृष्टीने शैक्षणिक, विविध सामाजिक उपक्रम आणि क्रीडा क्षेत्राला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. 

या उपक्रमांतर्गत क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन करणे, पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करणे, खेळाच्या सुविधा किमान गाव पातळीवर उपलब्ध करून देणे, मुलांमध्ये लहान वयातच खेळाची आवड निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाकडे वळविणे आणि त्याकरिता आवश्यक अशा उपाययोजना करण्यासाठी हे धोरण आखण्यात आलेले आहे. या धोरणांतर्गत उद्योजकांची चाचपणी राज्य पातळीवर सुरू असून काही उद्योजकांचा खेळाडूंनाही थेट फायदा होत आहे. 

याबाबत क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल म्हणाले की, क्रीडा क्षेत्राची प्रगती होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हे उद्योजकांचे सामाजिक उत्तरदायित्व धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, विविध सामाजिक संस्थांचाही समावेश आहे. वास्तविक पाहता पूर्वीपासूनच काही उद्योजकांचे खेळाडूंना सहकार्य असल्याचे निदर्शनास आलेले आहे. परंतु या धोरणामुळे अधिक प्रभाव पडू शकणार आहे.