Tue, Mar 19, 2019 11:21होमपेज › Pune › क्रांतिदिनी जिल्ह्यात ठिय्या आंदोलन

क्रांतिदिनी जिल्ह्यात ठिय्या आंदोलन

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबरोबरच इतर मागण्यांसाठी दि. 9 ऑगस्ट, क्रांतिदिनी पुणे जिल्ह्यात सर्वत्र ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. समन्वयकांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा बंद पुकारण्याबाबत आवाहन करण्यात आलेले नाही. परंतु, कोणतीही हिंसा न करता बंद पाळल्यास त्याला आमचा विरोध नसेल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा समन्वयकांच्या वतीने जाहीर करण्यात आली.राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की,  शहरात सर्व मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे, तर सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत ठिय्या आंदोलन करण्याचे निश्‍चित करण्यात आलेले आहे. 

शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्स्फुर्त आंदोलने होणार आहेत. तसेच, गुलटेकडी मार्केटयार्ड, महात्मा फुले मंडई तसेच रिक्षा पंचायतने बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा उत्सफुर्त बंदला समन्वयकांचा विरोध नाही. मात्र, कोणत्याही प्रकारे सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही व नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजीही घेणे गरजेचे आहे. 

सरकारच्या वतीने नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा समाजाला संयम बाळगळण्याचे आवाहन करण्यात आले असले, तरी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज शांत राहणार नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाबाबतची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे राज्यातील समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आत्तापर्यंतच्या घडलेल्या घटना, निर्णय आणि आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही राहुल पोकळे यांनी यावेळी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेला राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, राहुल पोकळे, विराज तावरे, बाळासाहेब आमराळे, उषा पाटील, धनंजय जाधव, दिपाली पाडाळे, सचिन आडेकर यांसह आंदोलनकर्ते उपस्थित होते.