होमपेज › Pune › आज पुणे जिल्ह्यात ठिय्या आंदोलन

आज पुणे जिल्ह्यात ठिय्या आंदोलन

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबरोबरच इतर मागण्यांसाठी दि. 9 ऑगस्ट, क्रांतिदिनी पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. समन्वयकांच्या वतीने कोणत्याही प्रकारचा बंद पुकारण्याबाबत आवाहन करण्यात आलेले नाही. परंतु, कोणतीही हिंसा न करता बंद पाळल्यास त्याला मराठा सकल क्रांती मोर्चाचा विरोध नसेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

शहरात सर्व मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत ठिय्या आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त आंदोलने होणार आहेत. तसेच, गुलटेकडी मार्केटयार्ड येथील मार्केट, महात्मा फुले मंडई, तसेच रिक्षा पंचायतीने बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. एसटी आणि पीएमपीएमएल या सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरु ठेवण्यात आल्या असून, परिस्थितीनुसार ती बंद करावयाची की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

मार्केटयार्ड येथील घाऊक बाजार संपूर्ण बंद राहणार आहे. सकाळी 10 वाजता मार्केटयार्ड येथील गणपती मंदिरापासून रॅली काढण्यात येणार असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करुन मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. त्याचबरोबर, शिवाजीनगर पुणे विभाग सकल मराठा समाजाच्या वतीने दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता जंगली महाराज मंदिरापासून रॅलीला सुरुवात होऊन  डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन, गुडलक चौक मार्ग तुकाराम पादुका चौक, शेतकी कॉलेज चौक, गणेशखिंड मार्गाने पुणे विद्यापीठाला वळसा घालून चाफेकर नगर, सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर एसटी स्टँड, वाकडेवाडी भुयारी मार्ग, शासकीय दूध डेरीला वळसा घालून वाकडेवाडी रोडमार्ग पाटील इस्टेट उड्डाणपूल, संचेती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

वारजे सकल मराठा समाजाच्या वतीने एरंडवणा, पौंड रोड, कोथरूड, कर्वेनगर, वारजे या भागातील सर्व मराठा समाज बांधव दुचाकी रॅली काढणार आहेत. या रॅलीचा शुभारंभ सकाळी 8.30 वाजता जुना जकातनाका वारजे डॉ. बाबासाहेब आंबेडर चौक येथून होणार आहे. त्याचबरोबर उर्से टोलनाका, कार्ला टोलनाका आणि  लोणावळा येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोणावळा येथे रेल्वे रोको आंदोलन ही होणार असून जुन्‍नर आणि आंबेगाव येथील संपुर्ण बंद पाळून ठिय्या आंदोलन होणार असल्याचे समन्वयकांच्या वतीने सांगण्यात आले. 

24 तास किरकोळ विक्रेते बंद पाळणार...

आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यामध्ये पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहरातील सर्व किरकोळ विक्रेते दुकानदार सहभागी होणार असून, मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत; तसेच ही सर्व दुकाने 24 तास बंद राहणार असून, एकही किरकोळ विक्रेते दुकान सुरू ठेवणार  नसल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.